रॉजर फेडररला नमवित जोकोव्हिच फायनलमध्ये 

मेलबर्न : वृत्तसंस्था 

नोव्हाक जोकोव्हिचने दुखापतग्रस्त रॉजर फेडररच्या आशेवर पाणी फिरवत गुरुवारी विक्रमी आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली व 17 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याच्या द‍ृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

फेडरर व जोकोव्हिच यांच्यामधील हा 50 वा सामना होता. यामध्ये सर्बियाच्या खेळाडूने सुरुवातीला सावधपणे खेळ करीत नंतर आपला दबदबा निर्माण केला. स्वित्झर्लंडच्या खेळाडूला 7-6 (7-1), 6-4, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. जोकोव्हिचचा सामना अंतिम फेरीत पाचव्या मानांकित डॉमेनिक थिएम व सातव्या मानांकित जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेव यांच्या सामन्यातील विजेत्याशी होईल. अंतिम सामन्यात जोकोव्हिचची कामगिरी चांगली राहिली आहे. जोकोव्हिचने सातवेळा येथे जेतेपद मिळवले आहे. रविवारी जोकोव्हिचने विजय मिळवल्यास तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचेल. कारण, राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत व्हावे लागले.

जोकोव्हिच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर म्हणाला की, सामन्यात कोर्टवर उतरण्यासाठी रॉजरचे आभार. कारण, त्याला खरोखर दुखापत झाली होती व त्यामुळे त्याला योग्य पद्धतीने हालचालदेखील करता येत नव्हती. त्याने पहिल्या सेटची सुरुवात चांगली केली व मी दबावाखाली आलो. माझ्यासाठी पहिला सेट जिंकणे महत्त्वाचे होते. मेलबर्नमध्ये चौथ्यांदा जोकोव्हिचने फेडररला पराभूत केले. यापूर्वी 2008, 2011 आणि 2016 मध्ये त्याने फेडररला नमविले. 2018 साली किताब जिंकणार्‍या फेडररने दुखापत होऊनदेखील कोर्टवर येणे पसंद केले. फेडररला पायावर पट्टी बांधलेले पाहण्यात आले होते आणि तो सामन्यातून माघार घेण्याची शक्यता होती. मात्र, फेडरर कोर्टवर सामना खेळण्यासाठी उतरला.

मुगुरुझा, केनिन महिला गटाच्या अंतिम फेरीत

बिनमानांकित गार्बाईन मुगुरुझाने दोन्ही सेटमध्ये पिछाडीनंतर जोरदार पुनरागमन करीत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित सिमोना हालेपला नमवित अंतिम फेरीत धडक मारली. तिचा सामना अंतिम फेरीत सोफिया केनिनशी होणार आहे. केनिनने उलटफेर करीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या एशलेग बार्टीला पराभूत करीत स्पर्धेबाहेर केले. स्पेनची दोनवेळची ग्रँडस्लॅम विजेती मुगुरुझाने हालेपला 7-6 (10/8), 7-5 असे पराभूत करीत पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. मुगुरुझा ही 2010 मध्ये बेल्जियमच्या जस्टिन हेनिननंतर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारणारी बिनमानांकित खेळाडू ठरली. अंतिम फेरीत स्थान मिळवल्याने मी आनंदी आहे. 'मला शनिवारी आणखीन एक सामना खेळायचा आहे,' असे मुगुरुझा म्हणाली. दुसरीकडे बार्टीने 1978 नंतर ऑस्ट्रेलियन ऑपन स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या जेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, केनिनने बार्टीला 7-6 (8/6), 7-5 असे पराभूत केले. 21 वर्षीय केनिनने पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली. 'माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. खरे तर मला विश्‍वासच बसत नाही. वयाच्या पाचव्या वर्षी इथेपर्यंत पोहोचायचे स्वप्न पाहिले होते व त्यासाठी मेहनत घेतली,' असे केनिन म्हणाली.

रोहन बोपन्‍नाचे आव्हान संपुष्टात

भारताचा रोहन बोपन्‍ना आणि युक्रेनची साथीदार नादिया किचेनोक जोडीला मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले. बोपन्‍ना व नादिया जोडी पराभूत झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारत व युक्रेनच्या जोडीला 47 मिनिटे चाललेल्या एकतर्फी लढतीत निकोला मेकटिच व बारबोरा क्रेसिको या क्रोएशिया व चेक प्रजासत्ताकच्या पाचव्या मानांकित जोडीकडून 0-6, 2-6 असे पराभूत व्हावे लागले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news