आता ‘बेंच स्ट्रेंग्थ’ची चाचणी | पुढारी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-20 सामना शुक्रवारी वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेेडियमवर होणार आहे. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकण्यात यश मिळवलेल्या भारतीय संघाला आता उरलेल्या दोन सामन्यांत 'बेंच स्ट्रेंग्थ' अर्थात राखीव फळीची चाचणी घेण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे नवीन 'चोकर्स' असा शिक्‍का बसू लागलेला न्यूझीलंड संघ या सामन्यात बाऊन्स बॅक करेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून भारताने मालिका आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे भारताला वर्ल्डकपच्या द‍ृष्टीने प्रयोग करण्याची ही चांगली संधी आहे. राखीव फळीतील खेळाडूंना संधी मिळू शकते. फलंदाजीत संजू सॅमसनला संधी देण्यासाठी श्रेयस अय्यर किंवा मनीष पांडे यापैकी एकाला बाहेर बसावे लागणार आहे; पण गोलंदाजीत मात्र प्रयोग करण्याला बराचसा वाव आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देऊन नवदीप सैनीला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदरसाठी शिवम दुबे किंवा रवींद्र जडेजाला बेंचवर बसावे लागेल. याशिवाय कुलदीप यादवसाठी युजवेेंद्र चहल याला खुर्ची रिकामी करावी लागेल.

बुमराहचा फॉर्म चिंतेचा विषय

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अलीकडील काळातील भारताचा 'मॅचविनर' हुकमी एक्‍का बनला आहे; पण हॅमिल्टन सामन्यात त्याने 45 धावा दिल्या आणि 'सुपर ओव्हर'मध्ये त्याने 17 धावा देऊन सामना जवळपास न्यूझीलंडच्या घशात घातला होता. सुदैवाने रोहितने तो घास काढून घेतला. आतापर्यंत खेळलेल्या 47 डावांत फक्‍त 4 वेळा बुमराहने 40 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. या तीन सामन्यात विल्यम्सनने बुमराहला जास्त धावा चोपल्या आहेत. आता वेलिंग्टनमध्ये बुमराह विल्यम्सनला कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, यावर पुढील मालिकांचे भवितव्य अवलंबून आहे. 

पीच रिपोर्ट

वेस्टपॅक मैदानावर झालेल्या गेल्या पाच सामन्यांपैकी पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ चारवेळा जिंकला आहे. गेल्या पाच सामन्यात पहिल्यांदा खेळणार्‍या संघाने सरासरी 178 धावा केल्या आहेत. ही खेळपट्टी सुरुवातीला वेगवान आणि नंतर फिरकी गोंलंदाजांना साथ देणारी आहे. तथापि, आकाश निरभ्र राहणार असल्याने फलंदाजांसाठी मेजवानीची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news