जोकोविचकडून फेडररचा धुव्वा; ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत केला प्रवेश

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्विझर्लंडच्या ३८ वर्षीय रॉजर फेडररवर ७-६ (७-१), ६-४, ६-३ असा सलग तीन सेटमध्ये एकतर्फी विजय मिळवला. या विजयसह जोकोविचने ८ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. अंतिम सामन्यात त्याचा सामना ऑस्ट्रियाचा डोमिनिक थिएम आणि जर्मनीचा ॲलेक्झांडर ज्वेरेव यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. फेडररचा उपांत्य फेरीत पराभव झाल्याने त्याचे २१ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

नोवाक जोकोवीचविरुद्ध रॉजर फेडरर यांच्यातील आजच्या (दि. ३०) सामन्याने प्रेक्षकांची एकप्रकारे निराशा झाल्याचे चित्र आहे. हा सामना २ तास १८ मिनिटात जोकोविचने खिशात टाकला. जागतिक क्रमवारीत दुस-यास्थानी असणा-या जोकोविचने आतापर्यंत ७ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले  आहे. त्याने २०१९ मध्ये स्पेनच्या राफेल नादालचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती. 

जागतिक क्रमवारीत तिस-यास्थानी असणा-या रॉजर फेडररने २० ग्रँड स्लॅम स्पर्धा आपल्या नावावर केल्या आहेत. त्याने ६ ऑस्ट्रेलियन, १ फ्रेंच, ८ विम्बल्डन आणि ५ यूएस ओपन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. फेडररने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. 

जोकोविच आणि फेडरर या दोन दिग्गजांमधील आजचा ५० वा सामना होता. यात जोकोविचचे पारडे जड असून त्याने २८ आणि फेडररने २३ वेळा विजय मिळविले आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धेत या दोघांमधील आजचा १८ वा सामना होता. यातही जोकोविच हाच भारी पडला आहे. जोकोविचने १२ वेळा विजय मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविच आणि फेडरर ५ वेळा आमनेसामने आले आहेत. यात फेडररला फक्त एकदाच विजय मिळविता आला आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news