शर्माजी का बेटा हैं ही ऐसा!

रोहित शर्माची एक खासियत आहे तो जरी इतर सामन्यात मनासारखा खेळला नाही, तरी महत्वाच्या सामन्यात तो हमखास खेळतो. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने हे दाखवून दिले. मालिका विजयासाठी महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात त्याने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर सामना टाय झाला आणि  सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. भारताला अखेरच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. स्ट्रईकला रोहित होता. सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून 1 षटकार आणि 1 चौकाराची होती. पण, रोहितने दोन षटकार मारत आपण कायमच चाहत्यांना एक्स्ट्रा देतो हे दाखवून दिले. 

रोहितची न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात म्हणावी तशी झाली नव्हती. पहिल्या टी- 20 सामन्यात 6 चेंडूत 7 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात त्याने 6 चेंडूत 8 धावा करुन फक्त एका धावेची सुधारणा केली. या साधारण कामगिरीनंतरही त्याच्यावर कोणी टीका केली नव्हती. कारण तो भारताच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या तिसऱ्या सामन्यात नक्की धुमाकूळ घालणार हा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता. तसेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याने पहिल्या सामन्यात 10 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात बरी कामगिरी करत 44 चेंडूत 42 धावा केल्या. पण, मलिका बरोबरीत आलेली असताना आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत 289 धावांचे लक्ष ठेवले असताना त्याने 119 धावांची दमदार खेळी करत भारताला मालिका विजय मिळवून दिला. 

हाच कित्ता त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी- 20 मालिकात गिरवला. भारताने पहिल्या दोन सामने सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात किवींचा संघ बाऊन्स बॅक करणार ही काळ्या दगडावरची रेष होती. कारण हा सामना मलिकेचा फैसला करणारा होता. रोहितने आपल्या दुसऱ्या सामन्यातील अपयश धूवन काढण्याचा चंग बांधला होता. त्यातच सामना मोक्याचा होता. ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी एकदम परफेक्ट. मग रोहितनेही आपली आतषबाजी करत 23 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने केलेल्या या तुफानी फलंदाजीमुळे भारत 10 षटकात शतकाच्या जवळ पोहचला. 

पण, किवींनीही सामना सोडायचा नाही असा चंग बांधला होता. त्यांनी दम लावून गोलंदाजी करत रोहितने करुन दिलेल्या या तुफानी सुरुवातीनंतरतही भारताला 179 धावात रोखलेच. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही आपला दम दाखवत किवींना ठराविक अंतराने धक्के देत त्यांच्या धावगताला ब्रेक लावला, पण किवींचा कर्णधार वेगळ्याच मूडमध्ये होता. तोही आपल्या झुंजार वृत्तीला जागला आणि त्याने 48 चेंडूत 95 धावांची तुफानी खेळी करत भारताकडे झुकलेले पारडे आपल्या बाजूने झुकवले. भारत आता सामना गमावणार आणि ऐतिहासिक मालिका विजयसाठी प्रतिक्षा लांबणार असे वाटत असतानाच मोहम्मद शमी धावून आला आणि त्याने अखेरच्या षटकात किवींना विजयासाठी 9 धावांची गरज असताना पहिल्यांदा विल्यम्सनला आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर 1 धावेची गरज असताना रॉस टेलरला बाद केले. 

यामुळे सामना टाय झाला आणि ऐतिहासिक मालिका विजयासाठी सुपर ओव्हरची अजून एक संधी मिळाली. पण, या सामन्यात सूर हरवलेल्या जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हरचे षटकही चांगले टाकले नाही. त्याने या षटकात 18 धावा दिल्या. त्यामुळे पुन्हा भारताला या अवघड स्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी रोहितवर आली. त्यानेच स्ट्राईक घेत ही जबाबदारी स्वीकारल्याचे सुचित केले. पण, पहिल्या दोन चेंडूवर त्याला मोठा फटका मारण्यात अपयश आले. त्यानंतर राहुललाही काही कमाल करता आली नाही. त्यामुळे अखेरच्या दोन चेंडूवर 10 धावा करण्याची जबाबदारीही शर्माजींवरच आली. 

मुंबईच्या या खडूस फलंदाजाने आपला खडूसपणा दाखवत आपण कधीही, कोठेही आणि केव्हाही षटकार मारु शकतो हे दाखवून देत. 5 व्या चेंडूवर उंच आणि लांब षटकार मारला. आता भारताला विजयासाठी 1 चेंडूत 4 धावांची गरज होती.  समोर शर्मा असला तरी न्यूझीलंड चेस करत असताना फलंदाजी करणाऱ्या टेलरची अवस्था काय झाली होती हेही नुकतेच समोर आले होते. त्याला 1 चेंडूवर 1 धावही करता आली नव्हती त्यामुळे विजयी घात त्याच्या तोंडात जाता जाता खाली पडला.

रोहितच्या बाबतीत असे होऊ नये यासाठी भारतीय चाहते प्रार्थना करत होते. पण, रोहित पावला पाहिजे फक्त एक चौकार असे मागणे सगळेच मागत असणार पण, शर्माजींनी ये दिल मांगे मोअर म्हणत चाहत्यांच्या पदरात षटकाराचेच दान घातले. त्यामुळे 'शर्माजी का बेटा हैं ही ऐसा! सौ मांगोगे दोसौ देगा, चौका मांगोगे छक्का मारेगा!' असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news