क्रीडा क्षेत्रांतील दिग्गजांसोबत पंतप्रधानांनी साधला संवाद | पुढारी

क्रीडा क्षेत्रांतील दिग्गजांसोबत पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाग्रस्तांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या 2 हजारांहून अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील 40 दिग्गज खेळाडूंसोबत संवाद साधला. सकाळी नऊ वाजता देशाला संबोधित केल्यानंतर क्रीडा क्षेत्रांतील खेळाडूंशी चर्चा करीत, लॉकडाऊन नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन जनतेला करण्याची विनंती पंतप्रधानांनी केली.

बैठकीत सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंगसह दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांसोबत चर्चा करीत ‘कोव्हिड-19’सारख्या प्राणघातक संसर्गासंबंधी देशवासीयांना जागरूक करण्याचे आवाहन केले होते. खेळाडूंचा चाहता वर्गही मोठा आहे. अशात प्रत्येकांनी देशासाठी नागरिकांना जागृत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. 

बैठकीत विश्वनाथन आनंद, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त, मनिका बत्रा, पी. टी. उषा, अंजू बॉबी जार्ज, मनू भाकर, मीराबाई चानू, गगन नारंग, अपूर्वी चंदेला, अभिषेक वर्मा, सरदार सिंह, राणी रामपाल, हिमा दास, नीरज चोपडा, अविनाश साबळे, केटी इरफान, बाईचूंग भूतिया, विनेश फोगाट, अंकिता रैना, रोहन बोपन्ना, दीपिका कुमारी आदी खेळाडू सहभागी झाले होते. 

Back to top button