मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 26 मिलियन डॉलरच्या एकूण कमाईसह जगातील सर्वाधिक कमाई करणार्या खेळाडूंच्या 2020 फोर्ब्स यादीत असलेला एकमात्र भारतीय आहे. जगातील आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये सहभागी असलेला विराट 100 खेळाडूंच्या यादीत 66 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी तो 100 व्या स्थानी होता आणि 2018 मध्ये तो 83 व्या स्थानावर होता.
जाहिराती आणि अन्य करारांच्या माध्यमातून 24 मिलियन डॉलर आणि वेतन व पुरस्कार रकमेच्या माध्यमातून त्याने 2 मिलियन डॉलर इतकी कमाई केली आहे. गेल्यावर्षी 25 मिलियन अमेरिकन डॉलर कमाईसह तो 100 व्या स्थानी होता आणि 2018 साली 24 मिलियन डॉलरसह तो 83 व्या स्थानावर होता. टेनिसमधील दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर 106.3 मिलियन डॉलर (800 कोटींहून अधिक) कमाईसह 2020 च्या सर्वाधिक कमाई करणार्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.
फुटबॉल खेळाडू ख्रिस्टीआनो रोनाल्डो (105 मिलियन डॉलर) व लियोनल मेस्सी (104 मिलियन डॉलर) अनुकमे दुसर्या आणि तिसर्या स्थानी आहेत. नेमार, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लेब्रॉन जेम्स, केविन डूरांट (बास्केटबॉल), टायगर वूडस् (गोल्फ), कर्क कझिन्स (अमेरिकन फुटबॉल) आणि कार्सन वेन्त्झ (अमेरिकन फुटबॉल) यांचा क्रमांक लागतो.