आशियात क्रिकेट रुळावर येतयं, लंकेची प्रॅक्टिस सुरु  | पुढारी

आशियात क्रिकेट रुळावर येतयं, लंकेची प्रॅक्टिस सुरु 

कोलंबो : पुढारी ऑनलाईन 

कोरोनामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये गेलेले जग आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनमुळे जगभरातलं क्रिकेटही थांबलं होतं ते आता पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपले सराव शिबीर सुरु केले आसून, कोलंबोत १२ दिवसांचा रेसिडेंशियल ट्रेनिंग कॅम्प सुरु केला आहे. 

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ‘संघातील काही खेळाडू सराव सुरु करतील, ज्यामध्ये प्रामुख्याने गोलंदाजांचा समावेश आहे. तसेच काही दुखापतीतून सावरणारे खेळाडूही कोलंबोत सरावाला सुरुवात करणार आहेत.’ असे अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नुवान प्रदीप, वानिंदू हसरंगा, कुसल जनिथ परेरा आणि दनुष्का गुलतिलका या खेळाडूंचा समावेश आहे. 

या सराव शिबीरात तीनही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा प्रथम समावेश करण्यात आला आहे. यामध्येही पहिल्यांदा गोलंदाजांना प्राधान्य देण्यात आले आहे. कारण त्यांना आपल्या लयीत येण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  

श्रीलंका क्रिकेट बोर्ड खबरदारीचे सर्व उपाय करत आहेत. याचबरोबर त्यांनी क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्याशीही सल्लामसलत केली आहे. त्यानुसार त्यांनी सराव शिबीरासाठी एक नवी कार्यपद्धती तयार केली आहे. 

श्रीलंका हा लॉकडाऊनंतर सराव सुरु करणारा आशियातील पहिला आणि जागतिक स्तरावरील इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघानंतरचा तिसरा संघ आहे.  

Back to top button