राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली | पुढारी

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जून पर्यंत वाढवली आहे. याचबरोबर मंत्रालयाने खेळाडूंना स्वतःचीच स्वत: शिफारस करण्याचीही परवानगी दिली आहे. मंत्रालयाने हा निर्णय खेळाडूंना कोरोनामुळे संघटनेचे नॉमिनेशन मिळवण्यात अडचणी येत असल्याने घेतला.  

आज (दि. 3 ) ही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी नॉमिनेशन दाखल करण्याची अंतिम तारीख होती. पण, खेळाडूंना लॉकडाऊनमळे त्यांच्या खेळाच्या अधिकृत संघटनेकडून नॉमिनेशन मिळवणे सध्या कठीण जात आहे. त्यामुळेच मंत्रालयाने नॉमिनेशन दाखल करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. तसेच आता खेळाडूंना संघटनेबरोबरच वैयक्तीकरित्याही नॉमिनेशन दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर अर्जातील शिफारशीचा रकाना रिक्त ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. महामारीच्या काळात क्रीडा मंत्रालयाने ई मेलद्वारे अर्ज करण्यास सांगितले आहे. 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या फेडरेशन, क्रीडा संघटना किंवा माजी पुरस्कार विजेत्यांची शिफारस बंधनकारक आहे. या शिथीलतेमुळे ज्या खेळाडूंना त्यांच्या खेळाच्या संबंधित राष्ट्रीय संघटनेची शिफारस मिळालेली नाही त्यांनाही आता पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ज्यात राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचाही समावेश आहे ते भारताचे हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी म्हणजे 29 ऑगस्टला दिले जातात.  

Back to top button