IPL 2022 : गुजरात टायटन्स प्ले-ऑफमध्ये | पुढारी

IPL 2022 : गुजरात टायटन्स प्ले-ऑफमध्ये

पुणे ; वृत्तसंस्था : सलामीवीर शुभमन गिलच्या (63) चिवट अर्धशतकानंतर जादुई फिरकीपटू राशिद खानच्या (24 धावांत 45 विकेट) भेदक गोलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंटस्चा 62 धावांनी धुव्वा उडविला. या विजयाबरोबरच गुजरातने आयपीएल 2022 च्या प्ले-ऑफमध्ये सर्वप्रथम प्रवेश केला. या सामन्यात लखनौची फलंदाजी फ्लॉप झाली.

विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान नजरेसमोर ठेवून उतरलेल्या लखनौने निराशाजनक कामगिरी करताना 13.5 षटकांत सर्वबाद 82 धावा काढल्या. डिकॉक व केएल राहुल यांनी लखनौच्या डावास सावध सुरुवात केली. मात्र, संघाची धावसंख्या अवघी 19 असताना डिकॉकला (11) यश दयालने साई किशोरकरवी झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार राहुलही अवघ्या 8 धावांवर बाद झाल्याने लखनौची 2 बाद 24 अशी स्थिती झाली. राहुलचा अडथळा शमीने दूर केला. सलामी जोडी परतल्यानंतर लखनौची फलंदाजी पूर्णपणे गडगडली.

त्यानंतर दीपक हुडाला साथ देण्यासाठी आलेला करण शर्माही (4) लवकर बाद झाल्याने लखनौची 3 बाद 33 अशी स्थिती झाली. त्यानंतर हुडा व कृणाल पांड्या हे संघाला सावरणार असे वाटत असतानाच राशिदने साहाकरवी कृणालला (5) यष्टिचित केले. यामुळे लखनौची स्थिती 4 बाद 45 अशी दयनीय स्थिती झाली. नवव्या षटकात लखनौचे अर्धशतक पूर्ण झाले.

संघ अडचणीत असताना पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न आयुष बदोनी (8) च्या अंगलट आला. त्याला साई किशोरच्या गोलंदाजीवर साहाने यष्टिचित केले. गुजरातची अवस्था 5 बाद 61 अशी बिकट असताना दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मार्कस स्टोईनिस अवघ्या 2 धावांवर धावबाद झाला. पाठोपाठ जेसन होल्डरला (1) पायचित करून राशिद खानने लखनौला सातवा धक्का दिला. तर मोहसिन खान (1) लवकर बाद झाला.

एका बाजूने संघर्ष करत असलेल्या हुडाला (27) राशिद खानने शमीकरवी झेलबाद करून गुजरातची 9 बाद 70 अशी अत्यंत दयनीय स्थिती केली. तर राशिदनेच आवेश खानला (12) साहाकरवी झेलबाद करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लखनौच्या वतीने राशिदने 24 धावांत 4 विकेट घेतल्या. तर दयाल व साई किशोर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 144 धावा जमविल्या. शुभमन गिल व वृद्धिमान साहा यांनी सुरुवात केली. मात्र, मोहसीन खानने आवेश खानकरवी साहाला (5) झेलबाद करून गुजरातला पहिला धक्का दिला, तर मॅथ्यू वेडचा (10) अडथळा आवेश खानने दूर केला.

नवव्या षटकात गुजरातचे अर्धशतक फलकावर लागले. मात्र, हार्दिक पंड्या 11 धावांवर परतल्याने गुजरातची स्थिती 3 बाद 51 अशी बिकट झाली. त्याला आवेश खानने डिकॉककडे झेल देण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर सलामीवीर गिल आणि डेव्हिड मिलर यांनी कोसळणारा डाव सावरताना 16 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, याचवेळी मिलर 26 धावांवर बाद झाला. मिलरने गिलसोबत 39 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी साकारली.

सलामीवीर गिलने 42 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सत्रातील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. त्याने तेवातियाच्या साथीने शेवटच्या 4 षटकांत 41 धावांची भागीदारी साकारून गुजरातला 20 षटकांत 4 बाद 144 अशी समाधानकारक स्थिती प्राप्त करून दिली. गिल 63, तर तेवातिया 22 धावांवर नाबाद राहिले. लखनौच्या वतीने आवेश खानने दोन विकेट घेतल्या.

Back to top button