‘शारीरिक, मानसिक आरोग्याचा तोल सांभाळा’ (video)

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाविषयी फारशी चर्चा न करता वर्तमानात जगायला शिका, असा सल्ला देत ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ, पुण्याच्या रुबी हॉस्पिटलचे डॉ. जगदीश हिरेमठ यांनी या सर्व काळात दमायचं नाही हे लक्षात ठेवा, असा आरोग्य मंत्र दिला. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा तोल सांभाळा. समतोल आहार घ्या आणि मास्क, व्हॅक्सिनेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन या 'एमव्हीएसएस' सूत्राचा वापर करण्याचा मंत्र त्यांनी दिला. 

दैनिक 'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने  'डॉक्टर्स डे'निमित्त गुरुवारी आयोजित  वेबिनारमध्ये डॉ. हिरेमठ  'कोव्हिड आणि आरोग्य' या विषयावर बोलत होते.

'पुढारी' पेपर्स प्रा. लि.चे  चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर हा समाजाचा अविभाज्य घटक असून त्याची जाणीव नेहमीच होत असते. गेल्या दीड ते दोन वर्षांत ती अधिक प्रमाणात वाढली आहे. गेली 17 वर्षे दै. 'पुढारी'ने अविरतपणे ही आरोग्य व्याख्यानमाला सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉक्टरांचे योगदान मोठे ः सतेज पाटील

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गेली 15 महिने डॉक्टरांनी समाजासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगून जीवाची पर्वा न करता ते कार्यरत आहेत. आरोग्य व्याख्यानमालेद्वारे समाजात आरोग्याविषयी जागरुकता होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण भाषण नाही, तर मैत्रीपूर्ण संवाद साधत असल्याचे सांगून डॉ. हिरेमठ म्हणाले की, संवादाची ही संधी दिल्याबद्दल आपण दै. 'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे आभार मानतो. गेले काही महिने आपण एका परिस्थितीतून वाटचाल करीत आहोत. आपण स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात नैराश्य आले आहे. कोठे व्यसनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मध्यंतरी दिवाळीच्या काळात सारे संकट संपले, असे वाटून आपण मुक्तपणे वावर सुरू केला होता; पण पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सारे चित्र बदलून गेले.

आज दुसरी लाट कमी होत आहे. या काळात जगायचे कसे, हा सर्वांनाच प्रश्न आहे. जगणे कठीण झाले आहे, हे मात्र खरे आहे, मग ते जगणे अंबानींचे असेल किंवा रोजंदारीवरील माणसाचे असेल, असे सांगून डॉ. हिरेमठ म्हणाले  की, या सर्व काळात आपल्याला जगायचे आहे. टिकून राहायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल, त्याचाच विचार आपण करू. 

तुम्ही रस्त्यावर दोरीवर चालणार्‍या डोंबार्‍याचा खेळ पाहिला असेल किंवा चित्रपटात माधुरी दीक्षितचे नृत्य पाहिले असेल. यामध्ये तोल सांभाळणे ही समान गोष्ट आहे. आज जगण्यासाठी हाच तोल सांभाळायचा आहे. तो शारीरिक आरोग्याचा आहे तसा मानसिक आरोग्याचा आहे. असे सांगत हिरेमठ यांनी बॅलन्स (तोल) यातून जगण्याचे मर्म उलगडून दाखविले. 

बॅलन्समधील बी म्हणजे बॉडी (शरीर) असे म्हणत त्यांनी या काळात जगण्यासाठी समतोल आहार घ्या. चांगल्या प्रथिनांचा आहारात समावेश करा. दम लागेल असा व्यायाम करू नका. पुरेशी झोप घ्या. वावरताना कापेल, भाजेल अशा गोष्टी घडणार नाहीत, याची काळजी घ्या आणि प्रतिकारक्षमता कायम ठेवा, असा मोलाचा सल्ला डॉ. हिरेमठ यांनी दिला. या सर्व काळात आपला रक्तदाब आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राखण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

व्यायाम शक्य नसेल, तर दर अर्ध्या तासांनी आपल्या पायावर दोन मिनिटे का होईना, उभे राहा, असा सल्ला देऊन डॉ. हिरेमठ म्हणाले की, तुम्ही कोरोना आहे म्हणून तुमच्या अन्य दैनंदिन बाबीकडे दुर्लक्ष करू नका. त्या तशा सुरू ठेवा. मुले, मित्र, परिवार यांच्याशी तुम्ही आधुनिक संपर्काच्या माध्यमातून संपर्कात राहा.

तुमचे शरीर योग्यप्रकारे सांभाळणे हीच देवपूजा असल्याचे सांगून डॉ. हिरेमठ म्हणाले की, विरंगुळा म्हणून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा; पण काहीही झाले, तरी दमता कामा नये, याचे भान ठेवा. समतोल आहाराबरोबरच पुरेशी विश्रांती गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, आजच्या काळात याची खूप गरज आहे. 

जगाचा शेवट आला की काय, असे वाटावे, अशी परिस्थिती आहे. म्हणून घाबरून जाऊ नका. ताणतणाव घेऊन जगू नका. तणावमुक्त राहा. नैराश्य येऊ शकते. त्याचप्रमाणे घाबरायलाही होते. ज्या प्रकारे विविध माध्यमांतून अनेक प्रकारे माहितीचा मारा होत आहे, त्याकडे फार लक्ष देऊ नका. दिवसातून एकदाच केवळ स्वतःच्या माहितीसाठी कोरोनाविषयक बातम्या पाहा आणि त्याची अतिरिक्त चर्चा करू नका. आपण एकत्र जमतो तेव्हा कोरोनाविषयक चर्चा टाळा. त्याऐवजी इतर विषयांची चर्चा करा. त्यामुळे सर्वांचेच मनोबल उंचावेल.

वर्तमानात जगा

जसे आहे तसे राहणे, धैर्य कायम ठेवणे आणि वर्तमानात जगणे यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नाही. ती मानसिकता असणे गरजेचे आहे. ती आचरणात आणा, असे सांगत डॉ. हिरेमठ म्हणाले की, मेडिटेशनची गरज लागतेच; पण सध्याची गरज पाहता तुम्ही प्रवाहात राहा. तेच खूप झाले, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाविषयी अतिप्रमाणात माहिती घेऊ नका किंवा त्याची अति चर्चा करू नका, असे सांगताना डॉ. हिरेमठ म्हणाले की, केवळ माहिती म्हणून दिवसातून एकदा त्याविषयी बातमी वाचा, ऐका, पाहा; पण तीच तीच चर्चा करून कोरोनाचा ओव्हर डोस घेऊ नका आणि चांगले काम करताना ते इतरांपर्यंत पोहोचेल, याची काळजी करू नका. कारण, तुम्ही जे करीत असता ते ज्याच्यासाठी केले त्याच्यापर्यंत पोहोचत असते, हे लक्षात ठेवा.

आज लसीकरणाची गरज आहे. किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण होईल तेव्हा हर्ड इम्युनिटी तयार होईल. लस घेऊ की नको, असा प्रश्न मनात न आणता स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी लस घ्या. जी  उपलब्ध आहे ती घ्या. कारण, या स्थितीतून बाहेर पडणे हीच आजची गरज आहे. आपल्याला छान जगायचे आहे, एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि तसे आचरण करा, असेही ते म्हणाले.

आज उद्योग व्यवसाय अडचणीत आहेत, तरीही तुम्ही क्रियाशील राहिले पाहिजे. काही काळ ही परिस्थिती राहणार आहे आणि ही परिस्थिती एका देशात नाही तर सर्व जगभर आहे. कठीण आर्थिक परिस्थितीला आपण तोंड देत आहोत. भविष्याविषयी माहिती नाही. अनिश्चितता आणि असुरक्षितता आहे, तरीही आपल्याला जगायचे आहे. त्याद़ृष्टीने वाटचाल सुरू ठेवा.

स्वागत व प्रास्ताविक करताना समन्वयक डॉ. संदीप पाटील यांनी या व्याख्यानमालेने समाजाला संजीवनी दिल्याचे सांगून आरोग्य, शिक्षण आणि आरोग्य प्रबोधनाच्या वाटचालीत या व्याख्यानमालेने वेगळी उंची गाठल्याचे सांगितले. अनेक जागतिक कीर्तीच्या नामवंतांनी या व्याख्यानमालेत योगदान दिल्याचे ते म्हणाले. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै हा 'डॉक्टर डे' साजरा केला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणे हेच त्यांचे खरे स्मरण असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने डॉ. हिरेमठ यांनी मने जिंकली

'आनंद' चित्रपटातील कविता डॉ. जगदीश हिरेमठ यांनी अमिताभ बच्चन यांच्या शैलीत पेश केली.  'मौत तू एक कविता है. मुझसे कविता का वादा है' या कवितेच्या ओळींनी सर्वांना भारावून टाकले.

कोरोनामुक्त गावांसाठी पुढाकार घ्या

ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुंबईसारख्या शहरात धारावीमध्ये कोरोना नियंत्रणात आला. जर हे तिथे होत असेल, तर पाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात आणणे सहज शक्य आहे. कोरोनामुक्त गावांसाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

दुबईसह विविध ठिकाणी वेबिनारला प्रतिसाद

दुबईतील मराठी मंडळ व आखाती मराठी बांधव यांनी आवर्जून हा वेबिनार पाहिला. एवढेच नव्हे, तर त्याचे फोटोही त्यांनी 'पुढारी'कडे शेअर केले आहेत. यासह मुंबई, पुणे व बहुतेक सर्व शहरांत आणि ग्रामीण भागातही या वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.

तिसरी लाट सौम्य असेल

पहिली लाट आली. ती हळूवारपणे वाढत गेली आणि कमी झाली. दुसरी लाट जोरकसपणे आली. मृत्यूदरही जास्त होता. ती आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. या काळात बर्‍याच प्रमाणात जागृती झाली आहे. लसीकरण झाले आहे. तिसरी लाट कदाचित सौम्य असेल, अशी शक्यता व्यक्त करून त्याविषयी अकारण भीती बाळगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news