स्पर्धा परीक्षा विश्वात 'अशा' आत्महत्या होतच राहणार! | पुढारी

स्पर्धा परीक्षा विश्वात 'अशा' आत्महत्या होतच राहणार!

अर्जुन नलवडे : पुढारी ऑनलाईन

सहाच्या ठोक्याला ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमधील लाईट्स सुरू केले. तसाच टीव्हीदेखील ऑन केला. वृत्तवाहिनीवरील निवेदिकेने सकाळच्या फास्ट बातम्या सांगायला सुरुवात केली. त्यातील एका बातमीनं माझं लक्ष खेचलं. बातमीच्या खाली ओळ होती की, “एमपीएससी मायाजाल आहे… उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून नोकरी नाही… पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाची आत्महत्या.” खरं सांगतो, या घटनेनं मला फारसं वाईट वाटलं नाही. कारण, पुणे विद्यापीठातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करणारा बालाजी मुंडे असो… की, दिल्लीमध्ये युपीएससी करणाऱ्या डाॅ. विकास बोंदरने केलेली आत्महत्या असो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन प्रिती जाधवसारख्या मुलीने केलेली आत्महत्या असो… किंवा आता फुरसुंगीमध्ये स्वप्नील लोणकरने राहत्या घरात केलेली आत्महत्या असो… या सगळ्यांनी आपल्या संघर्षाच्या जगण्याला फुलस्टाॅप दिलाय. उदबत्तीच्या धुरासारखी यांची हुशारी हवेत विरून गेलीय आणि मागे उरलीय फक्त स्वप्नांची राख… ही विझलेली राखच मागे उरलेल्यांना स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना जाळत राहणार आहे. 

साधारणपणे मागील १२-१५ वर्षांपासून महाराष्ट्रात स्पर्धा परिक्षेचं आलेलं हे खूळ मुलांच्या जगण्याचं वाटोळं करतंय. त्यांच्या जीवावर उठलंय. आई-बापांच्या अफाट कष्टातून… समाजाच्या टक्के-टोमण्यातून… स्वतःच्या स्वाभिमानातून… प्रेमभंगाचा बदला म्हणून… अवास्तव स्वप्नांचे ओझे पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून आणि व्यवस्था बदलण्याच्या महत्वाकांक्षेतून जन्माला येते स्पर्धा. तीच स्पर्धा शिक्षणाच्या वाटेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मग, चाकोरीबद्ध जगण्याची चौकट भेदण्याचा संघर्ष सुरू होतो. समाजातील तृतीय आणि चतुर्थ पातळीवरील जगणं जगणाऱ्या मुलांच्या मनात ती ठिणगी व्यवस्थेकडूनच पेटवली जाते. पेटलेली ठिणगी जास्त भडका उठवायला लागली की, शेवटी व्यवस्थाच तो संपूर्ण जाळच विझवून टाकते, असंच काहीसं वातावरण स्पर्धा परिक्षेच्या विश्वात जाणीवपूर्वक (पुन्हा एकदा लक्षात घ्या…) तयार करण्यात आलंय. 

आत्महत्या केलेल्या स्वप्नीलने पत्राल लिहिलंय की, “प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत चाललंय. आत्मविश्वास तळाला जातोय आणि स्वतःवर शंका यायला सुरूवात झालीय”, त्याची ही वाक्यं प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने अधोरेखित करून ठेवायला हवं. भलेही तुम्ही एखाद्या स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकात महत्वाची ओळ हायलाईट करता आणि आठवत राहता, ते राहिलं तरी चालेल. पण, स्वप्नीलची ही वाक्यं पुन्हा पुन्हा लक्षात ठेवत रहा. कृत्रिम व्यवस्थेचा बळी ठरता आहात तुम्ही. स्वप्नांचं बाजारीकरण करून स्वतःची घरं भरणारे क्लासेसकर्ते आणि सरकारी नोकरी भरतीचं गाजर दाखवून वर्षोनुवर्षं ताटकळत ठेवणारी सरकारी व्यवस्था आता या मुलांच्या जीवावर उठलीय. आणि या स्पर्धा परिक्षेच्या मुलांनीही वास्तवतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या डोळ्यांवर अवास्तवतेच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांचे चष्मे चढवून आपल्याच विश्वात रममाण झालेले आहेत. पण, जेव्हा एखादा हुशार मुलगा हा चष्मा काढतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, आपण बळी ठरलोय!

उघड्या डोळ्यांना दिसणारं धडधडीत वास्तव?

राज्य सरकारने नोकर कपातीचं धोरण अवलंबलं. रिक्त जागा भरायच्याच नाहीत असं अप्रत्यक्षपणे ठरवलं. जास्तीत जास्त कंत्राटी पद्धतीने काही वर्षांकरिता नोकर भरती करवून घ्यायची, सरकारच्या या धोरणांमुळे स्पर्धा परिक्षेतील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. सरकारने मागील ३ वर्षांपासून नोकरी भरतीच्या जाहिराती काढल्या. पण, परिक्षाच घेतल्या नाहीत. लक्षात घेण्यासारखी साधी गोष्ट आहे… मागील २ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये ४ जागा रिक्त आहे. त्या जागा भरणं सरकारला झालेलं नाही. अहो! ज्या आयोगाकडून हजारो सरकारी अधिकारी आणि कर्मचारी भरती करून घेतले जातात. तिथल्याच जागा भरल्या गेल्या नसतील, तर कोणत्या अपेक्षेने ही मुलं आपल्या सरकारी नोकरी मिळेल, याची अपेक्षा करतात?

नाव न सांगण्याच्या अटीवर (त्याला असं वाटतं की, भविष्यात सरकारी नोकरी मिळेल आणि माध्यमांमध्ये माझं नाव प्रसिद्ध झालं की, अडचण येईल… या भीतीने) एक विद्यार्थी सांगतो की, मागील ७ वर्षांपासून मी स्पर्धा परिक्षेची तयारी करतो आहे. पहिल्यांदा युपीएससी करून आयएएस करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पुण्याला आलो. घरंची परिस्थिती बेताची. दोन लहान बहिणी. जेमतेम शेती. आई-वडील शेतात राबतात. गावाकडं बी-काॅमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. गावाकडच्या काॅलेजात मोठमोठ्या अधिकाऱ्यांची आणि क्लासेसवाल्यांची भाषणं ऐकलेली. दहावी-बारावीत चांगले मार्क्स मिळाल्यामुळे माझ्या घरातल्यांना आणि समाजाला वाटलं की, मी अधिकारी होऊ शकतो. मलाही वाटलं खरंच आपण अधिकारी होऊ शकतो. सरळ आलो पुण्याला… आई-बाबांनादेखील अधिकारी होण्याचा विश्वास दिला होता. पण, ७ वर्षं झाली स्पर्धा परिक्षाच करतोय. शासन सरळ एक निर्णय घेत नाही आणि घेतलेला निर्णय अंमलात आणत नाही. मी एमपीएससी पूर्वपरीक्षा ४ वेळा पास झालोय आणि मुख्य परिक्षेला दोनवेळा पास झालोय. मुलाखतीची वाट पाहतोय. पण, मागील ३ वर्षांपासून मुलाखतच झालेली नाहीये. घरी असंच जावं तर कोणत्या तोंडाने गावाकडे जावं हा प्रश्न पडतो.” तो सांगताना भावनिक होत होता आणि पुन्हा-पुन्हा विनवणी करत होता की, सर प्लीज माझं नाव छापू नका. 

तो पुढे सांगतो की, “घरातल्यांनी अधिकारी होणार म्हणून क्लासच्या फीज भरण्यासाठी कर्ज काढलंय. दोन बहिणी वयात आल्यात. आई-वडील दिवसेंदिवस थकत चाललेत. मी इकडं सरकारी अधिकारी होण्याची वाट पाहतोय. संध्याकाळी मेसमध्ये जेवून खोलीत गेलो की, विचारांचा आंगडोंब उसळतो. कमीपणाची भावना निर्माण होते. मागे दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, आई-बाबांचा, बहिणींचा चेहरा समोर आला, ते धाडस झालं नाही. दिवसेंदिवस आपलं कसं होईल, या एकाच प्रश्नाने मनातून पोखरत चाललोय”, तो सांगत होता आणि परिस्थिती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहत होती. 

खरंतर नोकर भरतीची संधी मिळाली नाही म्हणून स्पर्धा परिक्षेचे उमेदवार चिंताग्रस्त झालेले दिसताहेत. घेतलेल्या शाखेचं शिक्षण काही कामाचं नाही. तिथं नोकरी मिळण्याची आणि आयुष्य स्थिर होण्याची शक्यताच नसल्यामुळे स्पर्धा परिक्षेकडे ही मुलं वळली. बरं, यात काय कमी स्पर्धा आहे? स्पर्धा परीक्षा पास होण्याची आणि अधिकारी होण्याची क्षमता हजारो (लाखो मुलं अशीच एकमेकांच्या नादानं आलेली असतात) मुलांच्यात नक्कीच आहे. त्यांनी ते सिद्धही करू दाखवलं आहे. पण, सरकारने भरती करून घेतलं पाहिजे ना? स्वप्नील आत्महत्येपूर्वी पत्रात लिहितो की, “२ वर्षं झालीत पास होऊन आणि २४ वय संपत आलंय. घेतलेलं कर्ज… खासगी नोकरी करून कधीही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर… घरातल्यांचा आणि इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा… माझी स्वतःच कमी पडत असल्याची वाढत चाललेली भावना…”, हे स्वप्नीलचे हे शब्दं स्पर्धा परिक्षेतील खरं वास्तव अधोरेखित करताहेत. 

वाढती बेरोजगारी, वाढत जाणारं वय, आर्थिक चणचण, समाजाचा आणि कुटुंबाचा ताण, लग्न ठरण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, उमेदवारांसमोर स्पर्धा परिक्षेशिवाय कोणताच पर्याय नसणं, वाढत जाणारी व्यसनाधिनता, शासनाकडून भरतीच्या प्रक्रियंसंबधी उदासिन धोरणं, मुलांच्या आत्महत्येला प्रामुख्यानं ही कारणं ठरत आहेत. आणखी एक स्पर्धा परिक्षेचा उमेदवार सांगतो की, “बार्टी, सारथी, महाज्योती,TRTI, यशदा, Pri- IAS सेंटर या शासनाच्या संस्थामधून उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी ७५ कोटींपेक्षा जास्त जवळपास खर्च केला जातो. जर भरती केली जाणार नसेल तर, या खर्च केलेल्या पैशांचं काय? स्पर्धा परिक्षेमध्ये योग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी आयोगाकडून किंवा राज्य शासनाकडून एखादी समिती स्थापन करण्यात आली पाहिजे, पण असे निर्णयच कधी घेतले जात नाहीत. सध्या आयोगाकडे २३ लाखांपेक्षा उमेदवारांची नोंद आहे आणि आयोग दरवर्षी फक्त ४ ते ५ हजार जागाच भरते. मग बाकीच्या उमेदवारांनी करायचं काय? इतकंच नाही, तर राज्याच्या विविध विभाग, महामंडळ (जिल्हा स्तरावरील मिळून) साडेचार लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. पण, भरती केली जात नाही. कोण जबाबदार याला?”, असे प्रश्नं उद्विग्न अवस्थेत येऊन हा उमेदवार उपस्थित करतो. 

१५-१६ वर्षांपूर्वी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत नापास झाल्याने किंवा मार्क्स कमी मिळाल्याने आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकरणं वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये दिसत होती. तिच परिस्थिती स्पर्धा परिक्षेमध्ये तणावाखाली आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कमी-अधिक प्रमाणात दिसत आहे. कधी आत्महत्या असते किंवा कधी व्यवस्थेनं अप्रत्यक्षपणे केलेली हत्याच असते. पण, एखादी घटना वारंवार घडू लागली की, तिचं महत्व राहत नाही. त्याचा कोणाला फरक पडत नाही. हे रोजचंच आहे असं म्हणतं दुर्लक्ष केलं जातं. हळहळपणाची भावना आटत जाते. तशीच भावना स्पर्धा परिक्षेतील आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तयार होत चाललीय. स्वप्नील लोणकराच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त जाईल, बातम्यांमध्ये दोन-तासांसाठी बातम्याही दाखवल्या जातील. त्यानं आपल्या जीवनाला कायमचा फुलस्टाॅप दिलाय. पण खरं सांगतो… ही नकारात्मकता नाहीये तर वास्तव आहे. स्पर्धा परिक्षेतील अनेक तणावग्रस्त विद्यार्थ्यांचा प्रवास हा जीवन संपवण्याकडे चाललाय…   

Back to top button