

वॉशिंग्टन ः रशियाचे एक जुने यान आता तब्बल 50 वर्षांनंतर पृथ्वीवर कोसळणार आहे. शुक्राचे निरीक्षण करण्यासाठी पाठवलेल्या या व्हिनस प्रोबचे नाव आहे 'कॉसमॉस 482'. 1972 मध्ये तत्कालीन सोव्हिएट संघाने त्याचे प्रक्षेपण केले होते. मात्र, त्याचे लाँचिंग अपयशी ठरले. ते कधीही पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेलेच नाही. आता ते उलट पृथ्वीच्याच दिशेने येऊ लागले असून त्याच्या अखेरच्या कक्षेत पोहोचले आहे. ते 2024 ते 2027 या काळात कधीही पृथ्वीवर कोसळू शकते.
स्पेस सिच्युएशन अवेअरनेस सल्लागार मार्को लँगबोक यांनी सांगितले की हे यान सध्या पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत आले आहे याचा अर्थ ते भविष्यात पृथ्वीच्या वातावरणातही प्रवेश करू शकते. पुढील तीन-चार वर्षांमध्येच असे घडू शकेल. शक्यतो 2025-26 या काळात ते पृथ्वीच्या वातावरणात येईल. तरीही ते जळून जाणार नाही कारण त्याला पृथ्वीपेक्षाही घनदाट वातावरण असलेल्या ग्रहाच्या दृष्टीने बनवण्यात आले होते. 1972 पासून ते पृथ्वीच्या 7,700 किलोमीटर अंतरापर्यंत आलेले आहे. हे यान भविष्यात पृथ्वीच्या 52 अंश उत्तर व 52 अंश दक्षिणेत कोसळू शकते. त्यामध्ये युरोप आणि आशियाचा एक मोठा हिस्सा येतो.