

श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर नेहमी आपल्या कम्फर्ट झोनबाहेरील विषय निवडून अशा चित्रपटात काम करणे विशेष पसंत करते आणि या निकषावर 'उलझ' या चित्रपटाबद्दल ती विशेष महत्त्वाकांक्षी आहे. या आगामी चित्रपटात जान्हवी कपूर एका आयएफएस अधिकार्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे लंडनमधील शेड्यूल नुकतेच पूर्ण झाले आणि त्यानंतर जान्हवीने याची माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून दिली. लंडनमधील 20 दिवसांचे शेड्यूल पार पडले आणि आता आणखी 20 दिवसांचे शेड्यूल बाकी आहे.
नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिका साकारण्यात मला अधिक स्वारस्य असते आणि त्याचमुळे मी या चित्रपटाला प्राधान्य दिले. मी या चित्रपटात एका आयएफएस अधिकार्याची भूमिका साकारत आहे. देशभक्ती नसानसात भिनलेल्या कुटुंबात वाढलेल्या अधिकार्याचा जीव धोक्यात आल्यावर काय होते, यावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे, असे जान्हवी याबद्दल बोलताना म्हणाली. सुधांशू सरिया या चित्रपटाचे निर्देशन करत असून, जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात जान्हवीशिवाय गुलशन देवय्या व रोशन मॅथ्यू यांच्याही भूमिका असणार आहेत.