

करण जोहरच्या चर्चित टॉक शो ‘कॉफी विथ करण’मध्ये आतापर्यंत जवळजवळ सर्व मोठे बॉलीवूड स्टार्स आणि काही क्रिकेटपटूही पाहुणे म्हणून आले आहेत. मात्र, क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी कधीही एकत्रितरीत्या शोमध्ये पाहायला मिळालेली नाही.
अनुष्का शर्मा स्वतः शोमध्ये आलेली आहे; पण पती विराट कोहलीसोबत ती कधीच या शोमध्ये आलेली नाही. करणने सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये नुकताच याचा खुलासा केला. सानियाने विचारले की, कोणत्या सेलिब्रिटीला आमंत्रित करायचे आहे; पण त्यांनी नकार दिला. त्यावर करण म्हणाला की, क्रिकेटरांना आता मी आमंत्रित करत नाही. त्याने हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांचा संदर्भ दिला.
2019 मध्ये या दोघा क्रिकेटर्सच्या एपिसोडनंतर सोशल मीडियावर मोठी टीका झाली होती. त्यांची महिला विरोधी आणि सेक्सिस्ट कमेंटस् सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. दोघांनी माफी मागितली असली, तरीही त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया वन-डे सामन्यापूर्वी सस्पेंड करण्यात आले होते. करण जोहर म्हणाले की, या घटनेनंतर त्यांनी कोणत्याही क्रिकेटरला शोमध्ये आमंत्रित करणे टाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विराट कोहली कधीही ‘कॉफी विथ करण’चा भाग बनला नाही आणि भविष्यातही त्यांना आमंत्रित करण्याचा विचार नाही.