

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या स्टार कपलने गल्ली क्रिकेट खेळत असतानाचा एक अनोखा व्हिडीओ शेअर केला असून, नेटिझन्सनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओमध्ये विराट व अनुष्का गल्ली क्रिकेट खेळत आहेत आणि त्यात नियम मात्र सर्व अनुष्काचेच आहेत. अनुष्का नियम वाचून दाखवताना म्हणते की, 'जर तीन वेळा बॉल मिस झाला, तर आऊट. जर तू चिडलास, तर आऊट. अंगाला बॉल लागला तरीही तू आऊट.' अनुष्का ही नियमावली वाचत असताना विराट तिला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, 'चल बस, आता खेळू.' त्याचवेळी अनुष्का त्याला आणखी एक नियम सांगते की, 'ज्याची बॅट, त्याची बॅटिंग.' त्यामुळे ती त्याच्याकडून बॅट घेते आणि फलंदाजी करायला जाते.
फलंदाजी करत असताना ती पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड होते; पण त्यानंतर ती आणखी एक नियम सांगते, 'पहिला बॉल हा ट्रायल.' पण नंतर पुढच्या बॉलवरही विराट तिला आऊट करतो. त्यानंतर अनुष्काच्या गोलंदाजीवर विराट मोठा फटका खेळतो आणि अनुष्का म्हणते, 'नवा नियम, जो बॉल मारेल, तोच परत घेऊन येईल.' त्यानंतर विराट वैतागून चेंडू आणायला जातो. पुढच्या चेंडूवर विराट लांब थांबलेला असतानाच अनुष्का त्याला आऊट करते. विराट आणि अनुष्का यांचा हा गमतीशीर व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंटस्देखील केल्या आहेत.