

दमदार अभिनयाने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणार्या अभिनेत्री विद्या बालनने चित्रपटसृष्टीत यशस्वी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. आज एक प्रस्थापित अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते, पण हा प्रवास सोपा नव्हता. यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी तिला बॉडीशेमिंगपासून ते तिच्या दिसण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने तिच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी, ‘परिणीता’चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी तिला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता, हा धक्कादायक खुलासा केला आहे.
विद्या म्हणाली की. ‘परिणीता’ हा माझा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता आणि याच चित्रपटाच्या वेळी मला हा अनपेक्षित सल्ला मिळाला होता. हो, विधू विनोद चोप्रा यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते, ‘तुझे नाक खूप लांब आहे, तुझी सर्जरी करून घेऊया’; पण मी ठामपणे नकार दिला. मी माझ्या चेहर्यावर कधीही कोणती शस्त्रक्रिया केली नाही, साध्या फेशियलशिवाय मी काही करत नाही.
देवाने जसा चेहरा दिला आहे, तसाच तो ठेवावा यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. एका मल्याळम चित्रपटाच्या वेळी, मला मंजू वारियर किंवा संयुक्ता वर्मा यांच्याप्रमाणे ‘बालन’ हे आडनाव काढून माझ्या समाजाचे नाव ‘अय्यर’ लावण्यास सांगण्यात आलं. मी माझे नाव ‘विद्या अय्यर’ असे बदलले आणि खूप रडले. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला समजावले की, तू नेहमीच ‘विद्या बालन’ राहशील.