नव्या वर्षात तुम्ही कोणते चित्रपट पाहणार?

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

नव्या रुपेरी पडद्यावर एकापेक्षा एक मराठी चित्रपटांची मेजवानी असणार आहे. अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नवीन वर्षात चित्रपटांबरोबर वेबसीरीजदेखील भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे स्वप्निल जोशीचा समांतर २ वेबसीरीजची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी मराठी चित्रपटांचे कथानक आणि नावेदेखील नाविन्यपूर्ण आहेत. तुम्ही कोणकोणते चित्रपट पाहणार? 

'सटवाई'

सटवाई जन्मतःच नशीब लिहून ठेवत असते. अशाच नशीबाची अनोखी गोष्ट दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित 'सटवाई' या चित्रपटातून उलगडणार आहे. सुरज झांजगे निर्मित या चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारी २०२१ मध्ये सुरू होत आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आणि तंत्रज्ञ कोण हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. 

सुश्रुत भागवतचा ८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी! 

सुश्रुत भागवत दिग्दर्शित '८ दोन ७५' फक्त इच्छाशक्ती हवी! या अनोख्या चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर रिलीज झालं आहे. विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी खुमासदार संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजशिर्के असे कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार अवधूत गुप्ते ही जोडी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळत आहे.


'करंट'

मराठमोळी अभिनेत्री मोनालिसा बागलचा 'करंट' हा मराठी चित्रपट येतोय. अनुप जगदाळे दिग्दर्शित, नामदेव मिरकुठे लिखित 'करंट' चित्रपटाची निर्मिती दिक्षा युवराज सुरवाडे यांनी केली आहे. २१ मे २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


'डार्लिंग' 

अभिनेता निखील चव्हाण 'डार्लिंग' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील 'डार्लिंग तू' आणि 'हैं प्यार' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गाण्यात निखिल आणि रितिका श्रोत्रीची जोडी झळकली आहे. त्यासोबत अभिनेता प्रथमेश परबदेखील आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिंग चित्रपट ७ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'संत मारो सेवालाल'

संत सेवालाल यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा "संत मारो सेवालाल" हा चित्रपट ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे बंजारा भाषेतील आहे. चित्रपटाची निर्मिती अशोक तुकारामराव कामले तर लेखन, दिग्दर्शन  अरूण मोहन राठोड यांनी केलं आहे. जीतेश राठोड यांनी छायांकन आणि बबली हक यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष राठोड यांनी संत सेवालाल यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. दुष्काळ, अडचणीत असलेला शेतकरी या समस्या मांडतानाच "संत सेवालाल" यांचा जीवनपट, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला संदेश असे या चित्रपटाचं कथानक आहे. 

'समांतर-२' वेबसीरीज

समांतर चित्रपटाच्या दुसऱ्या सीझनमध्ये नितीश भारद्वाज-स्वप्निल जोशी यांच्या अभिनय जुगलबंदीची प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. 'समांतर' वेबसीरीजच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर या सीरीजचे चित्रीकरण पाचगणी येथे झाले. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत. यामध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.

सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सीरीज आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की, त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेऊ लागतो.

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या 'कृष्ण' (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या दोघांची मालिका म्हणूनही 'समांतर'बद्दल रसिकांमध्ये कुतूहल आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news