

पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूडमधील जब वी मेट , जन्नत ते आजच्या काळातील केसरीया यासारख्या लोकप्रिय गाण्याचे संगीतकार प्रितम यांच्या मुंबई येथील स्टुडिओत ४० लाख रुपयांची चोरी झाली आहे. याबाबत मालाड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्डुडिओत काम करणारा स्पॉटबॉय आशीष सयाल (वय ३२) हा पैसे घेऊन पळून गेला आहे. याबाबातची फिर्याद प्रितम यांच्या मॅनेजरने दिली आहे. याबाबात अधिक माहिती अशी प्रितम यांचे गोरगांव येथे यूनिमस रिकॉर्ड प्रायव्हेट लिमीटेड नावाचा स्डुडिओ व ऑफिस आहे. याठिकाणी चोरीची घटना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. यादिवशी प्रोडक्शनचा एक व्यक्ति ४० लाखांची कॅश असलेली बॅग घेऊन ऑफिसमध्ये आला त्याने ती प्रितम यांचे मॅनेजर विनीत चेड्डा यांच्याकडे दिली. यावेळी आशीष सयाल, अहमद खान व कमाल दिशा नावाचे कर्मचारी तेथे उपस्थित होते.
यानंतर हे पैसे त्यांनी एका ट्रॉली बॅगेत ठेवले व काही पेपर सही करण्यासाठी प्रितम यांच्या फ्लॅटमध्ये गेले. प्रितम यांचे घरही याच बिल्डिंगमध्ये आहे. ते जेव्हा परत आले त्यावेळी पैसे गायब झाले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरु केली. तेव्हा कळाले की आशिष सयाल हा हे पैसे प्रितम यांच्या घरी ठेवण्यासाठी घेऊन जातो असे सांगून बॅग घेऊन स्डूडिओतून बाहेर पडला होता. मॅनेजरने तत्काळ सयाल याच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्या फोन बंद येत होता. यानंतर मॅनेजरने ही बाब प्रितम यांच्या कानावर घातली. त्यावेळी त्यांनी फिर्याद देण्यास सांगितले. पोलिस सयाल याचा शोध घेत आहे.