

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा २ (Pushpa 2: The Rule) चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि. २६) हैदराबादमध्ये तेलुगू कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) वडील अल्लू अरविंद हेदेखील उपस्थित होते. तेलंगणा फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (FDC) चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिल राजू यांनी सांगितले की, रेवंत रेड्डी यांच्यासोबतची बैठक सरकार आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील संबंध चांगले राहावेत यासाठी होती.
हैदराबादमधील संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक आणि त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा जखमी झाला. रेवंत रेड्डी यांच्या सरकारने जाहीर केले आहे की ते फायद्यासाठीचे शो आणि तिकीट दर वाढवण्यास परवानगी देणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आज तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी आज मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली.
India Today TV ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीदरम्यान रेवंत रेड्डी यांनी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांना सांगितले की सेलिब्रिटींनी फॅन्सच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असले पाहिजे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नही.
एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलुगू कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांसोबतच्या बैठकीत सांगितले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही सरकार तेलुगू चित्रपट उद्योगाच्या पाठीशी आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या बैठकीत संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला निर्माते अल्लू अरविंद, सुरेश दग्गुबाती, सुनील नारंग, सुप्रिया, नागा वामशी आणि पुष्पा 2 चे निर्माते नवीन येरनेनी आणि रविशंकर उपस्थित होते.