

Darshan Kumar Passes Away
मुंबई : टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू दर्शन कुमार यांचे शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.दर्शन कुमार हे जरी प्रसिद्धीच्या झोतापासून बऱ्याच अंशी दूर राहिले असले, तरीही या उद्योगामध्ये एक दयाळू आणि उदार मनाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.
आपल्या निस्वार्थी योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या दर्शन कुमार यांनी पडद्याआड राहून अनेक कलाकारांना पाठिंबा दिला. भारताच्या संगीत क्षेत्राला महत्त्वपूर्ण आकार देणाऱ्या टी सीरीज कुटुंबाचा ते एक अविभाज्य भाग होते. त्यांच्या निधनानंतर, ज्यांनी त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर जवळून ओळखले होते, अशा अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गायक मिका सिंग याने इन्स्टाग्रामवर एका भावपूर्ण मेसेज पोस्ट केला आहे. त्याने लिहिले, "आताच एक अत्यंत दुःखद बातमी समजली की, टी-सीरीजचे मालक दर्शन कुमार जी यांनी आपल्या सुंदर आठवणी मागे ठेवून आपला निरोप घेतला आहे. ते खरोखरच एक महान व्यक्ती होते आणि नेहमीच इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असत. त्यांनी अनेक गायकांना संधी दिली, त्यांना पाठिंबा दिला आणि असंख्य प्रतिभावंतांना आपली कला सादर करण्याची कवाडे खुली करून दिली. माता राणी त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांना चिरंतन मुक्ती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती."
१९८३ मध्ये, गुलशन कुमार दुआ यांनी 'सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड'ची स्थापना केली. ही कंपनी पुढे 'टी-सीरीज' नावाने ओळखली जाऊ लागली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या संगीत क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली. त्यांच्या कार्यामुळे संगीत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत अधिक सहजतेने पोहोचू शकले. गुलशन कुमार यांनी भक्तीगीते आणि चित्रपटांमधील गाणी देशातील कानाकोपऱ्यातील घराघरांपर्यंत पोहोचवली.
गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या 'जीतेश्वर महादेव मंदिरा'बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात कृष्ण कुमार आणि भूषण कुमार यांनी कंपनीची धुरा सांभाळली. भूषण कुमार यांनी 'टी-सीरीज'चे रूपांतर एका जागतिक दर्जाच्या मनोरंजन सम्राज्यात केले. आज या कुटुंबाचा वारसा केवळ व्यावसायिक यशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो त्यांच्या सर्जनशील योगदानातूनही पुढे नेला जात आहे; ज्यामध्ये तुलसी कुमार आणि खुशाली कुमार यांसारख्या कलाकारांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुलशन कुमार कुटुंबामध्ये दर्शन कुमार, गोपाल कृष्ण आणि कृष्ण कुमार या बंधूंचा समावेश होतो. यातील प्रत्येकाने कुटुंबाचा वारसा जपण्यास वेगवेगळ्या मार्गांनी योगदान दिले आहे.