पुढारी ऑनलाईन डेस्क
साठच्या दशकातील रोमँटिक हिरो सुनील दत्त यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात १९५५ मध्ये 'रेल्वे प्लॅटफॉर्म' या चित्रपटापासून केली. 'मदर इंडिया' आणि 'साधना' या चित्रपटांमुळे त्यांना अमाप प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर १९६३ मध्ये 'मुझे जीने दो' नावाच्या एका चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे. या चित्रपटामध्ये ते पहिल्यांदा डाकूच्या भूमिकेत दिसले. या भूमिकेची समीक्षकांकडून प्रशंसादेखील झाली.
खरे नाव बदलले…
सुनील दत्त यांचा २५ मे (२००५) रोजी स्मृतिदिन होय. सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज दत्त असे होते. परंतु, चित्रपटांमध्ये आल्यानंतर त्यांनी आपले नाव सुनील असे ठेवले. ते चित्रपटात आले तेव्हा बलराज साहनी एक मोठे अभिनेते होते. त्यामुळे नावे एकसारखी झाल्याने त्यांचे नाव बदलून सुनील दत्त असे ठेवण्यात आले.
सुनील दत्त यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. स्वातंत्र्यावेळी ते भारतात आले. त्यांना अभिनय क्षेत्रात यायचे होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत आले. मुंबईत अनेक वर्षे स्ट्रगल करावे लागलं.
सुपरहिट चित्रपट
पन्नास आणि ६० च्या दशकात सुनील दत्त यांचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामध्ये 'साधना' (१९५८), 'सुजाता' (१९५९), 'मुझे जीने दो' (१९६३), 'खानदान' (१९६५), 'पडोसन' (१९६७) या चित्रपटांचा समावेश आहे. निधनापूर्वीचा त्यांचा अखेरचा चित्रपट म्हणजे, 'मुन्ना भाई एमबीबीएस'. हा चित्रपट २००३ ला रिलीज झाला होता. मुलगा संजय दत्त याच्या वडिलांची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली होती. 'मदर इंडिया', 'खानदान', 'हमराज', 'मिलन', 'पडोसन', 'हीरा', 'जख्मी' आणि 'वक्त' यांसारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
२० चित्रपटांमध्ये बनले डाकू
सुनील दत्त यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जवळपास २० चित्रपटांमध्ये डाकूची भूमिका साकारली आहे. त्यांनी 'रेश्मा और शेरा', 'मुझे जीने दो', 'मदर इंडिया', 'जानी दुश्मन', 'बदले की आग' आणि 'राज तिलक' यासारख्या चित्रपटांमध्ये डाकूची भूमिका साकारली होती.
दरम्यान, त्यांची ओळख बी. आर. चोप्रा यांच्याशी झाली. त्यांच्या 'गुमराह' आणि 'वक्त' या चित्रपटात सुनील दत्त यांनी काम केले. १९६८ मध्ये सुनील दत्त हे निर्माता बनले. त्यांनी प्रोडक्शनअंतर्गत 'मन का मीत' चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी आपला लहान भाऊ सोम दत्तला ब्रेक दिला. यामध्ये त्यांनी अभिनेते विनोद खन्ना यांना खलनायक म्हणून ब्रेक दिला. इतकेच नाही तर पहिल्यांदा चित्रपट 'रेश्मा और शेरा'मध्ये अमिताभ बच्चन यांना संधी दिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर, सुनील दत्त खूपच चिंतेत होते. चित्रपटातील कामेही कमीच मिळू लागली होती.
सुनील यांनी १९८४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते खासदार बनले. दत्त यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. १९९५ मध्ये दत्त यांना फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुलगा संजय दत्त याला रॉकी चित्रपटातून त्यांनी लॉन्च केले.
२५ मे, २००५ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अधिक वाचा – ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन ३० जुलै रोजी करणार लग्न