पुढारी ऑनलाईन डेस्क
सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे, हे अनेकांना माहिती आहे. कारण, रजनीकांत यांनी हिंदीमध्येही बरेच काम केले आहे; पण रजनीकांत यांच्याप्रमाणेच अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांची सध्याची नावे ही त्यांची मूळ, खरी नावे नाहीत, तर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना ही नावे धारण केली होती आणि आता तीच त्यांची ओळख बनली आहे. अशाच काही दाक्षिणात्य सुरपस्टारर्सच्या मूळ नावांविषयी जाणून घेऊया!
कमल हासन
कमल हासनने बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांचे मूळ नाव पार्थसारथी श्रीनिवासन असे आहे.
अधिक वाचा : अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन
चिरंजीवी
तेलगू मेगास्टार चिरंजीवीचे मूळ नाव कोनिदेला सिवा संकरा वारा प्रसाद असे आहे. 1978 मध्ये त्याने पदार्पण केले होते.
धनुष
तामिळ आणि हिंदी चित्रपटांतील लक्षवेधी कामामुळे देशभरात फॅन फॉलोईंग असलेल्या धनुषचे मूळ नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा असे आहे. 15-16 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि 7 फिल्मफेअर मिळवले आहेत. धनुषचे 'कोलावरी डी' या गाण्याचा व्हिडीओ 100 मिलियन व्ह्यूज पार करणारा पहिला भारतीय म्युझिक व्हिडीओ होता.
अधिक वाचा : आयपीएल पार्ट-2 सप्टेंबरमध्ये ?
विजय
प्रेक्षकांनी 'थलपती' असे बिरुद दिलेला सुपरस्टार विजय कॉलीवूड म्हणजे तामिळ चित्रपटसृष्टीतील एक बडा अभिनेता आहे. त्याने 1984 मध्ये 'वेत्री' चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असे आहे.
प्रभास
'बाहुबली' चित्रपटामुळे देशभरात पोहोचलेला अभिनेता प्रभास याने 2002 मध्ये 'ईश्वर' चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याचे मूळ नाव उप्पलापती वेंकटा सत्यनारायणा प्रभास राजू असे आहे.
माम्मुटी
मल्याळम चित्रपटांमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेता माम्मुटी. त्यांनी सुमारे 400 हून अधिक चित्रपटांत काम केले असून त्यांचे मूळ नाव मुहम्मद कुट्टी पानापारांबिल इस्माईल असे आहे.
महेश बाबू
तामिळ चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या महेशबाबू याने 1999 मध्ये चित्रपटात नायक म्हणून पदार्पण केले. त्याचे मूळ नाव महेश घट्टामनेनी असे आहे.
सूर्या
तामिळ अभिनेता सूर्याचे मूळ नाव सर्वानन सिवाकुमार असे आहे. त्याने अभिनयासाठी आतापर्यंत चार फिल्मफेअर आणि तीन तामिळनाडू राज्य पुरस्कार जिंकले आहेत.
अधिक वाचा : श्वेता तिवारीचा पती म्हणतो, 'ती एक चांगली पत्नी'
यश
'केजीएफ' चित्रपटामुळे देशभरात प्रेक्षकवर्ग निर्माण केलेल्या कन्नड अभिनेता यश याचे मूळ नाव नवीन कुमार गौडा असे आहे.
पवन कल्याण
चिरंजीवीचा धाकटा भाऊ असलेल्या या अभिनेत्याने 1996 मध्ये तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याचे खरे नाव कोनिदेला कल्याण बाबू असे आहे.
ज्युनिअर एनटीआर
तेलगू अभिनेता ज्युनिअर एनटीआर याचे नाव त्याचे आजोबा अभिनेता, दिग्दर्शक एन. टी. रामाराव (नंदमुरी तारक रामाराव) यांच्यावरून ठेवण्यात आले आहे. एन. टी. रामाराव यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही भूषविले होते.