पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियातील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध कोरियन अभिनेता आणि मॉडेल साँग जे रिम (Song Jae Rim passes away) याचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याचा मृतदेह १२ नोव्हेंबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. साँग जे रिम याला त्याच्या 'द मून एम्ब्रेसिंग द सन' (The Moon Embracing the Sun) आणि 'क्वीन वू' या ड्रामा सीरीजमधील भूमिकेसाठी ओळखले जाते.
पोलीस या घटनेचा तपास करत आहे. रिपोर्टनुसार, घटनास्थळी दोन पानी पत्र आढळून आले आहेत. याविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही.
साँग जे रिम हा सेऊल येथील सेओंगडोंग जिल्ह्यातील अपार्टमेंटमध्ये राहत होता. तेथे तो मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी साँगच्या मृत्यूची पुष्टी केली. साँग जे रिमच्या घरी दोन पानी पत्र आढळून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
याआधी २० एप्रिल २०२३ रोजी के-पॉप बॉय बँड एस्ट्रोचा सदस्य मूनबीनदेखील त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचा मृतदेहही घरात संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यानंतर प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री पार्क सू रयूनचे जूनमध्ये निधन झाले. तिचा मृत्यू पायऱ्यांवरून खाली पडल्याने झाला होता. ती केवळ २९ वर्षांची होती. तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे अवयवदान केले होते.
साँग जे रिमने २००९ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याची 'मून एम्ब्रेसिंग द' या टीव्ही सीरीजमधील मुख्य भूमिका गाजली होती. त्याने राजाचा एक विश्वास बॉडीगार्ड किम जे वोनची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर त्याने इंडस्ट्रीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.