

दिग्दर्शक रायन कुगलर यांच्या ब्ल्यूज प्रेरित व्हॅम्पायरपट ‘सिनर्स’ ने ऑस्करच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अकादमी पुरस्कारांसाठी ‘सिनर्स’ला तब्बल 16 नामांकने मिळाली असून, यामुळे ‘ऑल अबाऊट ईव्ह’, ‘टायटॅनिक’ आणि ‘ला ला लँड’ या चित्रपटांनी केलेला 14 नामांकनांचा विक्रम मोडीत निघाला आहे.
‘सिनर्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथा या प्रमुख विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील मुख्य अभिनेता मायकेल बी. जॉर्डन याला त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच ऑस्कर नामांकन (सर्वोत्कृष्ट अभिनेता) मिळाले आहे. हा चित्रपट जिम क्रो काळातील पार्श्वभूमीवर आधारित असून, कृष्णवर्णीय समाजाच्या जीवनावर आधारित एक मिथकात्मक भयपट म्हणून त्याची विशेष दखल घेतली जात आहे. ऑस्कर शर्यतीत दुसर्या क्रमांकावर राहिला तो पॉल थॉमस अँडरसन दिग्दर्शित ‘वन बॅटल आफ्टर अनदर’. या चित्रपटाला 13 नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, टेयाना टेलर, बेनिसिओ डेल टोरो आणि सीन पेन यांच्या अभिनयाला नामांकन मिळाले आहे. मात्र, नवोदित अभिनेत्री चेस इन्फिनिटी हिचे नाव सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत स्थान मिळवू शकले नाही.
या दोन्ही चित्रपटांमधून समकालीन अमेरिकेतील अस्वस्थ सामाजिक व राजकीय वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असल्याचे समीक्षकांचे मत आहे. विशेष बाब म्हणजे ‘सिनर्स’ आणि ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ हे दोन्ही चित्रपट वॉर्नर ब्रदर्सच्या बॅनरखालील आहेत. नेटफ्लिक्सकडून वॉर्नर ब्रदर्सचे 72 अब्ज डॉलर्सना अधिग्रहण होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, स्टुडिओसाठी ही नामांकनांची सकाळ ऐतिहासिक ठरली आहे. ‘बुगोनिया’, ‘एफ’, ‘फ्रँकनस्टाइन’, ‘हॅम्नेट’, ‘मार्टी सुप्रीम’, ‘वन बॅटल आफ्टर अनदर’, ‘द सिक्रेट एजंट’, ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’, ‘सिनर्स’ आणि ‘ट्रेन ड्रीम्स’ हे चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकित झाले. गिलर्मो डेल टोरो यांचा ‘फ्रँकनस्टाइन’, जोश सॅफ्डी यांचा ‘मार्टी सुप्रीम’ आणि योआखिम ट्रायर यांचा ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’ या तिन्ही चित्रपटांना प्रत्येकी 9 नामांकने मिळाली आहेत.
‘मार्टी सुप्रीम’मधील भूमिकेसाठी टिमोथी शॅलमे याला तिसर्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागात नामांकन मिळाले असून तो यंदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मायकेल बी. जॉर्डन (सिन्नर्स), टिमोथी शॅलमे (मार्टी सुप्रीम), लिओनार्डो डिकॅप्रियो (वन बॅटल आफ्टर अनादर), इथन हॉक (ब्लू मून), वॅगनर मोरा (द सिक्रेट एजंट) हे स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी जेसी बक्ली, रोझ बर्न, केट हडसन, रेनाटे राईन्सवे, एम्मा स्टोन यांच्यात स्पर्धा आहे. यंदा ऑस्करमध्ये ‘कास्टिंग’साठी स्वतंत्र नवा पुरस्कार विभाग समाविष्ट करण्यात आला असून, त्यामुळे ‘सिनर्स’ आणि ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ यांच्या नामांकनांत भर पडली आहे. पुरस्कार सोहळा 15 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे.