Raja Shivaji Movie : शिवाजी महाराजांच्या भावविश्वाचा वेध - राजा शिवाजी
पुढारी चित्रपट परीक्षण (3.5 / 5)
अनुपमा गुंडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील निष्ठावंत शिलेदारांच्या एकनिष्ठता आणि शौर्यगाथेवरही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शिवरायांच्या शौर्यगाथाच या चित्रपटाच्या केंद्रस्थानी होत्या.
शिवाजी महाराज जेवढे पराक्रमी राजे, मुत्सद्दी लढवय्ये आणि जाणते राजे होते, तितकेच ते कुटुंबवत्सल मुलगा, पती आणि भाऊ देखील होते. मात्र आजवरच्या चित्रपटात आणि इतिहासाने त्यांच्या या स्वभावाची ओघवतीच दखल घेतली आहे. माता जिजाबाई बरोबरच स्वराज्यस्थापनेचे प्रेरणास्थान असणारे शिवरायांचे मोठे बंधू संभाजी महाराज आणि वडील शहाजी राजे यांच्या पराक्रमावर राजा शिवाजी प्रकाश टाकतो.
शिवाजी महाराजांना लढण्याचे बाळकडू वडील शहाजाी राजे यांच्याकडून मिळाले तसेच ते आजोबा लखुजी जाधवांकडूनही मिळाले. निजामशाहीचे सरदार असलेले लखुजी जाधव ( महेश मांजरेकर) मोहीमेवर निघाले आहेत. त्याचवेळी जिजाबाई त्यांना भेटायला येतात.
मोहीमेत लखुजी जाधव धारातीर्थी पडल्यानंतर जिजाबाई (भाग्यश्री ) आणि शहाजी राजे (सचिन खेडेकर) खिन्न मनाने मोगलांच्या अत्याचाराच्या पाढा वाचतात. मुघल साम्राज्य आणि सरदारांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात बंड पुकारण्याच्या ईराद्यांना भाऊबंदकीची साथ मिळत नसल्याने ते हतबल असतात. मात्र जिजाऊंच्या तालमीत स्वराज्याची प्रेरणा घेवून तयार झालेले संभाजी (अभिषेक बच्चन) आणि शिवाजी (रितेश देशमुख) हे दोन सुपुत्र स्वराज्याची वीट रचतात.
महाराजांच्या स्वराजप्रेरणेत जिजाऊ इतकेच मोठे बंधू संभाजी यांचे योगदान असल्याचे हा चित्रपट अधोरेखित करतो. तसेच दोन भावांमधील नाते, भावनिक जिव्हाळा यावरही चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
शिवरायांचे सईबाई, जिजाऊ बरोबरच्या नात्यावर चित्रपटाने भाष्य केले असले तरी शहाजी राजे आणि महाराजाच्या नाते तुलनेत झाकोळले जाते. आदिलशहा, निजामशहा त्यांचे सरदार त्यांच्या लढ्ाया प्रसंगानुरूप चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत.
अदिलशहा (अमोल गु्प्ते) , त्याची पत्नी (विद्या बालन), अफजल खान (संजय दत्त) यांची बेदरकार आणि सत्ता पिपासू वृत्तीचे दर्शन कलाकरांनी यथार्थ केले आहे, संजय दत्त यांचा अफजलखान तर आजवर कलाकारांनी साकारलेल्या अफजलखानात तर सर्वोत्तम.
कुटुंबवत्सल राजा, पराक्रमी योध्द्यााच्या रूपात रितेश देशमुख यांनी आपला ठसा उमटवला आहे. अफजलखानाच्या भेटीच्या वेळी जिवा महालाच्या भूमिकेत सलमान खान अवतरतात, पण जिवा महाला या अंगरक्षकाचे महाराजाच्या जीवनात मोठे योगदान आहे, मात्र चित्रपटात या भेटीच्या लढाईपुरताच जीवा महाला दिसतो.
शिवाजी महाराजांच्या वैयक्तीक भावविश्वावर प्रकाश टाकतांना त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंधाचे आणि त्यांच्या विश्वासू शिलेदार च्या प्रसंगात भावोत्कटता दाखविण्यात चित्रपट कमी पडतो.

