Arbaz Shaikh: 'माझ्या बापाला वाचवा...'; 'सैराट' फेम अरबाज शेख ढसाढसा रडला; रुग्णालयावर केले गंभीर आरोप, मदतीसाठी भावनिक साद

Arbaz Shaikh Father Treatment: 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेखने भावनिक व्हिडिओ शेअर करत आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
Arbaz Shaikh Father Treatment
Arbaz Shaikh Father TreatmentPudhari
Published on
Updated on

Arbaz Shaikh Father Treatment: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत अरबाजने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अक्षरशः रडत मदतीचे आवाहन करताना दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वडिलांची प्रकृती गंभीर, उपचार सुरू

अरबाजने सांगितले की, त्याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर त्यांना हृदयाशी संबंधित त्रासही जाणवू लागल्याने सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आलेल्या अनुभवामुळे त्याला रुग्णालय बदलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले.

रुग्णालयातील अनुभवाबाबत गंभीर आरोप

व्हिडिओमध्ये अरबाजने दावा केला की, रुग्णालयात दाखल करताना सुरुवातीला ठेव रक्कम (डिपॉझिट) भरावी लागली. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि इंजेक्शन्स केवळ रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधूनच खरेदी करण्याचा आग्रह करण्यात आला. बाहेरून औषधे आणण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्याने केला.

त्याच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील मेडिकलमधून घेतलेल्या औषधांसाठी 40 हजार रुपयांहून अधिक खर्च आला. हीच औषधे बाहेरील मेडिकलमध्ये अर्ध्या किमतीत उपलब्ध होती, असा दावाही त्याने केला.

'माझ्या वडिलांना वाचवायचंय'

भावनिक होत अरबाज म्हणाला, "माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांना मरताना पाहायचं नाही. मला त्यांना कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं आहे. योग्य उपचार कुठे मिळतील, याबाबत मार्गदर्शन करा. कृपया मला मदत करा." हे सांगताना त्याला अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Arbaz Shaikh Father Treatment
Crime news: "आयुष्य पुरे झालं" प्रियकराला शेवटचा मेसेज केला अन्...; महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सापडला तलावात मृतदेह

आर्थिक मदतीचे आवाहन

व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्येही अरबाजने आपल्या चाहत्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. वडिलांच्या उपचाराचा खर्च पेलणे कठीण जात असल्याचे सांगत, ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करावी किंवा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती त्याने केली आहे. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अरबाजने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ डिलिट केला आहे.

व्हिडिओनंतर चाहत्यांकडून पाठिंबा

अरबाजचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक चाहते आणि सोशल मीडिया युजर्स त्याच्या पाठीशी उभे राहत आहेत. अनेकांनी त्याच्या वडिलांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली असून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news