

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नैसर्गिक कुरळ्या केसांवर सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना, तुलसीदासांच्या रामचरितमानसमधील सीतेच्या सौंदर्यवर्णनाचा संदर्भ समोर आला आहे. यावर 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलियांनीही आपले मत व्यक्त केले असून, कलाकाराच्या अभिनयाला बाह्य रूपापेक्षा अधिक महत्त्व द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या लूकबाबत सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत असून, विशेषतः साई पल्लवीच्या नैसर्गिक कुरळ्या केसांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.
टीव्ही मालिका रामायणमध्ये सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी यावर भाष्य केले आहे. त्या दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीबद्दलही बोलल्या. साई पल्लवी रणबीर कपूर स्टारर रामायणमध्ये दिसणार असून सीता मातेच्या भूमिकेत असेल.
दीपिका चिखलिया काय म्हणाल्या?
'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीची निवड झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी साई पल्लवीच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले. मात्र, सीतेच्या रूपात ती कितपत प्रभावी दिसेल, याबाबत आत्ताच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दीपिका म्हणाल्या, "साई पल्लवीचा अभिनय मी पाहिला आहे आणि ती अत्यंत सक्षम कलाकार आहे. पण सीतेच्या वेशात तिचा संपूर्ण लूक कसा भासेल, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच सांगता येईल. त्यामुळे सध्या कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नाही."
सीतेच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, तुलसीदासांनी रामायणात सीतेचे वर्णन विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्यांसह केले आहे. बदामाच्या आकाराचे डोळे, ठरावीक उंची, लांबसडक केस आणि विशिष्ट वर्ण अशी तिची प्रतिमा मांडली गेली आहे. रामानंद सागर यांनाही याच वर्णनाशी मिळते-जुळते व्यक्तिमत्त्व हवे होते आणि ते त्यांना स्वतःमध्ये दिसल्याचे दीपिका यांनी नमूद केले.
चित्रपटातील कलाकारांविषयी विश्वास व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार गुणी आहेत. निर्मात्यांनी त्यांची निवड विचारपूर्वक केली असेल. त्यामुळे ते आपल्या भूमिकांना निश्चितच न्याय देतील, असा मला विश्वास आहे."
रावणाच्या भूमिकेत यश दिसणार, दीपिका चिखलिया म्हणाल्या-
'रामायण' चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता यशची निवड करण्यात आली आहे. याबाबत दीपिका चिखलिया म्हणाल्या की, यशचे काही चित्रपट त्यांनी पाहिले असून तो प्रभावी कलाकार आहे. त्यामुळे रावणाच्या भूमिकेतही तो ताकदीची छाप पाडेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. मात्र, रामानंद सागर यांच्या 'रामायण'ची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी असल्याने कोणत्याही नव्या आवृत्तीला त्याच स्थानापर्यंत पोहोचणे सोपे नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दीपिका यांनी 'सीता'ची भूमिका साकारल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीवर झालेल्या परिणामांबद्दलही स्पष्टपणे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, पण त्याचबरोबर इतर प्रकारच्या भूमिका मिळण्याचे मार्ग जवळपास बंद झाले. प्रेक्षक आणि निर्माते त्यांना कायम सीतेच्या प्रतिमेतच पाहू लागले, त्यामुळे नवीन संधी मिळणे कठीण झाले.
दीपिका म्हणाल्या, "लोकांनी मला इतक्या ठामपणे सीतेच्या भूमिकेशी जोडून ठेवले की इतर भूमिका माझ्याकडे आल्याच नाहीत. आजही मला कामासाठी प्रयत्न करावे लागतात." आजच्या कलाकारांची उदाहरणे देताना त्यांनी रणबीर कपूरचा उल्लेख केला. 'बर्फी', 'संजू' आणि 'ॲनिमल'सारख्या वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. आता तो 'रामायण'मध्ये प्रभू रामांची भूमिका साकारत आहे. आजच्या कलाकारांना विविध भूमिका साकारण्याची संधी मिळते, मात्र त्यांच्या काळात कलाकार अनेकदा एका विशिष्ट प्रतिमेत अडकून राहत असत. याच कारणामुळे पुढे त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकल्याचे दीपिका यांनी सांगितले.