

कांतारा : चॅप्टर 1 या वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरल्यानंतर अभिनेत्री रुक्मिणी वसंत सध्या चर्चेत आहे. चित्रपटात तिने साकारलेली राजकुमारी कनकावती या मुख्य खलनायिकेच्या भूमिकेनंतर रुक्मिणीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणाचे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत रुक्मिणीने सांगितले की, ‘सध्या अनेक चर्चा सुरू आहेत आणि त्या सर्व गोष्टींबद्दल मी खूप उत्सुक आहे.
हिंदी सिनेमाबाबत बोलताना रुक्मिणी म्हणाली की, तिला हिंदी भाषा लहानपणापासूनच परिचित आहे. ‘माझे बालपण लष्करी पार्श्वभूमीत गेले. वडील सैन्यात असल्यामुळे वेगवेगळ्या कॅन्टोन्मेंटस्मध्ये राहावे लागले आणि हिंदी ही अशी भाषा होती जी सर्वांना जोडणारी होती. त्यामुळे हिंदी चित्रपटांशीही कायम संपर्क राहिला. मात्र, हिंदीमध्ये अभिनय करून भावना व्यक्त करण्याची संधी अद्याप मिळाली नसल्याचे सांगत, लवकरच ती संधी मिळेल, अशी आशा तिने व्यक्त केली. रुक्मिणी अलीकडेच 29 वर्षांची झाली. तिच्यासाठी हे वर्ष अत्यंत खास ठरल्याचे तिने सांगितले. ‘या वर्षात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा विचार करताना खूप समाधान वाटते. अजून सेटवर काम करत असताना वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली नाही, पण भविष्यात ती नक्की मिळेल,’ असे ती म्हणाली.
10 डिसेंबर 1996 रोजी जन्मलेल्या रुक्मिणीने कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. 2019 मध्ये ‘बिरबल’ या कन्नड चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केले. 2023 मधील ‘सप्त सागरदाचे एलो’ या रोमँटिक ड्रामासाठी तिला फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड - बेस्ट अभिनेत्री (कन्नड) मिळाला.
‘कांतारा : चॅप्टर 1’ हा आजवरचा तिचा सर्वात मोठा हिट ठरला आहे. रुक्मिणीचे कुटुंबही तितकेच प्रेरणादायी आहे. तिचे वडील कर्नल वसंत वेणुगोपाल हे कर्नाटकचे पहिले अशोक चक्र सन्मानित अधिकारी होते. 2007 मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी येथे घुसखोरी रोखताना ते शहीद झाले. तिची आई सुभाषिणी वसंत या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्या युद्धानंतर सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी कार्य करतात.
रुक्मिणीने बंगळुरूमधील आर्मी स्कूल, एअर फोर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले असून लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस् (RADA) येथून अभिनयाचे औपचारिक शिक्षण घेतले आहे.