Actress Rhea Chakraborty | 7 वर्षांनंतर कमबॅक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर (Actress Rhea Chakraborty) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात प्रचंड वादळ आले होते. आरोप, टीका आणि बहिष्कार सहन केल्यानंतर आता 7 वर्षांनी रिया अभिनयाच्या दुनियेत जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. रिया नेटफ्लिक्सची आगामी वेब सीरिज ‘फॅमिली बिझनेस’मधून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सीरिजमध्ये अनिल कपूर आणि विजय वर्मादेखील आहेत.
रियाने सीरिजचा टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबतच इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘7 वर्षांनंतर’ असे लिहिले आहे. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया वादात अडकली होती. सप्टेंबर 2020 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्जशी संबंधित चॅटस्च्या आधारे तिला अटक केली. काही काळ तिने तुरुंगवासही भोगला. नंतर तिला जामीन मिळाला; मात्र दीर्घकाळ प्रवासावर निर्बंध होते. या काळात अनेक प्रोजेक्टस् तिच्या हातातून गेले आणि तिला मोठ्या प्रमाणावर टीका व ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 2025 मध्ये सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये रियाला सर्व आरोपांतून क्लीन चिट दिली.
रिया व्यतिरिक्त, हंसल मेहता दिग्दर्शित या मालिकेत अनिल, विजय, आकाश खुराना, नेहा धुपिया, अनंत नाग, कंवलजीत सिंग, ध्रुव सहगल, नंदिश संधू, टीना देसाई आणि रायमा सेन यांच्यासह दमदार कलाकार दिसणार आहेत. ही मालिका सत्ता, रक्ताचे नाते आणि विश्वासघात याभोवती फिरणारी एक हाय-व्होल्टेज कॉर्पोरेट ड्रामा आहे. अनिल कपूर आणि विजय वर्मा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

