मो. ग. रांगणेकरांच्या नाट्य निकेतन संस्थेमार्फत वसंत सबनीस यांच्या ह्दयस्वामिनी नाटकात त्यांनी त्यावेळच्या प्रसिध्द अभिनेत्री शांता जोग यांच्यासोबत काम केले. अभिनेते दत्ता भट गेल्यानंतर पटवर्धन यांना नटसम्राटमधल्या मुख्य भूमिकेसाठी पाचारण करण्यात आले, मात्र काही कारणाने त्यांना ही भूमिका मिळाली नाही. नटसम्राट मधील अप्पा बेलवलकरांची अजरामर भूमिका साकारायला मिळाली नाही, याची खंत त्यांच्या मनात होती. तसेच ऑथेल्लोदेखील साकारता आला नाही याचे शल्य त्यांना कायम बोचत राहिले. आरण्यक नाटक 44 वर्षांपूर्वीही त्यांनी स्पर्धेसाठी केले होते. या नाटकासाठी तेव्हा त्यांना धृतराष्ट्राच्या भूमिकेसाठी रौप्यपदकही मिळाले होते.त्यानंतर दोन वर्षापूर्वी पुन्हा याच नाटकात त्यांनी धृतराष्ट्र साकारला.
भूमिका साकारतांना वयाचा फरक आहे. तेव्हा मी तारुण्यात होतो, तेव्हा 100 वर्षांचा धृतराष्ट्र साकारताना वयाचा फरक पडतोच, पण वयानुसार प्रगल्भता, जाणिवा – नेणिवा वाढतात. भूमिकेचा आवाका, शब्दांचे अर्थ उलगडत जातात. त्यामुळे मीच साकारलेल्या या दोन्ही भूमिकांमध्ये खूपच फरक असल्याचे ते विनम्रपण नमूद करत असत. बेकेट या नाटकातील मुख्य भूमिका असलेल्या बेकेटची भूमिकाच आव्हानात्मक वाटल्याचे ते सांगतात. सतीश दुभाषी या दिग्गज कलाकारांबरोबर बेकेट, कौतेंत्य, आनंद या नाटकात त्यांनी भूमिका केल्या. अरुण सरनाईक, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, मधुकर तोरडमल, चित्तरंजन कोल्हटकर यांच्यासोबत त्यांनी अऩेक भूमिका साकारल्या.
भगवद्गीता पाठांतर
पटवर्धन यांची तल्लख स्मरणशक्ती अखेरपर्यंत कायम होती. वयाचा, कामाचा आणि कामाचे आणि पाठांतराचा काही संबंध नसतो, हे त्यांनी कृतीतून सिध्द केले होते. 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गगीता पाठ केली. शृंगेरी मठात त्यांनी भगवद्गीतेची परीक्षा ही दिली. ही परीक्षा प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. गीतेतले 700 श्लोक त्यांना मुखोद्गत होते.
उशिराने दखल
सुमारे 50 वर्षाहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात वावरूनही पटवर्धन हे पुरस्कारांपासून दूरच राहिले, पण त्याची खंत त्यांना नव्हती. 2019 मध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयाने 1 लाखांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
मुख्य भूमिकेची हुलकावणी
बेकेट नाटकातल्या प्रसिध्दीमुळे त्यांची आणि ह्षिकेश मुखर्जीची मैत्री झाली. मुखर्जी यांनी त्यांना लाठी चित्रपटात पटवर्धन यांना मुख्य भूमिका दिली. मात्र त्यानंतर काही काळातच मुखर्जी यांचे निधन झाल्याने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे पहिल्याच मध्यवर्ती भूमिकेने त्यांना हुलकावणी दिली.
वयाची पहिली 6 वर्षे सोडली तर सतत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अभिनयाच्या जगात वावरणार्या पटवर्धन यांचा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर हक्क होता. मात्र हे पद त्यांना मिळाले नाही आणि त्यांनी त्यासाठी कधी पुढाकार घेतला नाही. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष व्हावा, असे मला वाटले नाही, कारण नाट्यसंमेलनाध्यक्षपद ही शोभेची वस्तू झाली आहे.नाट्यसंमेलनध्यक्ष झाल्यावर व्यवसायातील लोकांना फरक पडतो, असे काहीही घडत नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष व्हावे, असे वाटले नाही, असे त्यांनी दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीत स्षष्ट केले होते.