सलग चित्रीकरणे आणि प्रमोशनच्या धावपळीनंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. तिने नुकताच इटलीतील रोम शहरात एक छोटा; पण निवांत ब्रेक घेतला असून, तिच्या सोशल मीडियावरील फोटो मालिकेमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटो अल्बममध्ये रश्मिकाचा अतिशय साधा, नैसर्गिक आणि वैयक्तिक प्रवास अनुभव दिसून येतो. कोणतेही भडक कॅप्शन, नियोजनबद्ध ट्रॅव्हल पोस्ट किंवा मोठे वर्णन न करता तिने फक्त ‘रोम सो फार...’ असे साधे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमधील पहिल्याच फोटोमध्ये रश्मिका कॅमेर्याकडे हसत पाहताना दिसते. तिच्या मागे एक पारंपरिक रोमन इमारत उभी आहे.
हा फोटो कुठलाही पोझ दिलेला नसून, जणू चालता-चालता टिपलेला क्षण वाटतो. इतर फोटोंमध्ये ती आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत रोमच्या अरुंद गल्ल्यांत फिरताना जुन्या दगडी भिंतींच्या पार्श्वभूमीवर लहान कॅफेमध्ये वेळ घालवताना दिसते. एका फोटोमध्ये अभिनेता आनंद देवरकोंडादेखील (विजय देवरकोंडाचा भाऊ) दिसतो. याशिवाय अनेक फोटोंमध्ये इटालियन पदार्थ, गोडधोड, डेझर्टस् आणि छोट्या-छोट्या खाद्य क्षणांचा समावेश आहे.