

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असताना अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न २००७ मध्ये झाले. संगीत सोहळ्यापासून ते पारंपरिक मिरवणुकीपर्यंत या जोडप्याच्या लग्नाची खूपच चर्चा त्यावेळी रंगली. या लग्नाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती; पण अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आमंत्रित करण्यात आले नव्हते. 'बंटी और बबली' या सिनेमात अभिषेक आणि राणी यांनी एकत्र काम केले होते. एका मुलाखतीत राणी हिने याबाबतचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, अभिषेक आपल्या लग्नात कोणाला आमंत्रित करतो, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न होता; पण मित्र असताना मला त्याने आमंत्रित न केल्याने मी गोंधळून गेले. कधी कधी कलाकारांची मैत्री केवळ सेटवर असते.
उद्या मी एखादा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेईन त्यावेळी मी काही मोजक्याच लोकांना बोलवेन. अभिषेकसोबत काम करण्याच्या चांगल्या आठवणी माझ्या कायम लक्षात राहतील. अभिषेक आणि राणी कधी काळी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. राणी हिला बच्चन कुटुंबाची सून व्हायचे होते; पण पुढे तसे काहीच न घडल्याचे सांगितले जात आहे. अभिषेक आणि राणी मुखर्जी यांनी एकापेक्षा अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.