

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘जेलर 2’ सध्या जोरात चर्चेत आहे. पहिल्या ‘जेलर’मध्ये मल्याळम सुपरस्टार मोहनलाल, कन्नड सुपरस्टार शिव राजकुमार यांचे कॅमियो होते. शिव राजकुमार यांचा कॅमियो तर प्रचंड गाजला.
केवळ एक टिश्यू पेपरचा बॉक्स घेऊन येतानाचा हा सीन आहे; पण त्याचे चित्रण आणि त्याची टायमिंग इतकी परफेक्ट जुळली आहे की, प्रेक्षकांना हा कॅमियो प्रचंड आवडला. हा सीन यूट्यूबवर आजही पाहिला जातो. नवीन माहितीनुसार शिव राजकुमार यांनी आधीच या चित्रपटासाठी शूटिंग पूर्ण केले असून ते आता पुन्हा जानेवारीत या चित्रपटाचे आणखी शूटिंग करणार आहेत.
दरम्यान, आता ‘जेलर 2’मधील कॅमियो चर्चेत येऊ लागले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात आता थेट शाहरूख खान दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘जेलर 2’मध्ये मोहनलाल, शिव राजकुमार हे तर आहेतच शिवाय विजय सेतुपती, विद्या बालन आणि मिथुन चक्रवर्तीही दिसणार आहेत. नोरा फतेही हीदेखील एका गाण्यापुरती दिसेल.
मिथुन यांचा ‘जेलर 2’ संदर्भातील एक इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ते सिनेमातील कलाकारांबद्दल बोलताना शाहरूख खानचे नाव घेतात. त्यांच्या या एका उल्लेखामुळेच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप ‘जेलर 2’च्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. शाहरूख किंवा त्याच्या टीमनेही याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इंडस्ट्रीतील चर्चांनुसार, ‘जेलर 2’ हा फक्त सीक्वेल नसेल, तर तो ‘जेलर युनिव्हर्स’चा मोठ्या प्रमाणात विस्तार करणारा सिनेमा असणार आहे. एकाच कथानकावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या सिक्वेलमध्ये वेगवेगळ्या भागांतील शक्तिशाली पात्रांचा समावेश केला जाणार आहे. प्रत्येक पात्राची कथा आणि सिनेमातील भूमिका स्वतंत्रपणे महत्त्वाची असणार आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा जवळपास 4 मिनिटांचा टीझर, ट्रेलर यूट्यूबवर आहे. त्यात संगीतकार अनिरुद्ध आणि नेल्सन दिसतात. तोदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला आहे.