

पुढारी ऑनलाईन डेस्क : संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी 'पुष्पा 2 : द रुल' (Pushpa 2 : The Rule) फेम अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची आज मंगळवारी (दि.२४) हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिस स्थानकात सुमारे ४ तास चौकशी करण्यात आली. अल्लू अर्जुनला पोलिसांनी संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. पोलिसांनी त्याला आज सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार तो दिलेल्या वेळेत चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात हजर झाला. तो पोलिस स्थानकात येणार असल्याचे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये (Sandhya theatre) अल्लू अर्जुन स्टारर (Allu Arjun) 'पुष्पा २' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी म्हणजेच ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी झाली होती. यात एका ३५ वर्षीय एम रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा श्री तेज (Sritej) नावाचा ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक रात्र कारागृहात काढल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. या प्रकरणी त्याची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी चौकशीदरम्यान अल्लू अर्जुनला ४ प्रश्न विचारले. तुम्हाला चित्रपटाच्या प्रीमियरला येण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारण्यात होती, हे तुम्हाला माहीत होते का?. पोलिसांनी परवानगी नाकारूनही विशेष स्क्रीनिंगला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला कोणी कॉल केला होता?. थिएटरबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती तुम्हाला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने दिली होती का?. पुष्पा-२ चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, याची माहिती तुम्हाला कधी कळाली?, असे चार प्रमुख प्रश्न पोलिसांनी अल्लू अर्जुनला चौकशीदरम्यान विचारले.
हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या नऊ दिवसांनंतर १३ डिसेंबरला अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. काही तासांनंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण एक रात्र कारागृहात काढल्यानंतर त्याची अंतरिम जामिनावर सुटका झाली.
अल्लू अर्जुनचे पुष्पा -२ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी थिएटरमध्ये अचानक आगमन झाल्याने गोंधळ उडाला. त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. त्याच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने धक्काबुक्की झाली. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी रेवती या महिलेला आणि तिच्या मुलाला गर्दीतून बाहेर काढले. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल्लू अर्जुन ९.३० वाजता आला. त्याच्या आगमनाची बातमी सगळीकडे पसरली. त्याने मुख्य प्रवेशद्वाराचा वापर केला. त्याने १५ ते २० मिनिटे बाहेर घालवली. त्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडो जमा झाले होते. त्याच्या सुरक्षा पथकाने आणि थिएटरमधील बाउन्सरनी जमावाला मागे ढकलले. यामुळे परिस्थिती आणखीच बिघडली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.