

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘परम सुंदरी’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातून ही नवी जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र आली. चित्रपट प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर, विशेषतः एक्सवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. बहुतांश प्रेक्षकांनी या चित्रपटाला बॉलीवूडचा एक अस्सल रोमँटिक चित्रपट म्हटले असून, सिद्धार्थ आणि जान्हवीच्या ‘केमिस्ट्री’चे भरभरून कौतुक केले आहे.
‘परम सुंदरी’ हा उत्तर भारतीय मुलगा आणि दक्षिण भारतीय मुलगी यांच्यातील प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहे. रोमान्स, संगीत, दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ आणि कौटुंबिक भावना यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात साधण्यात आल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. सिनेरसिकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. यामध्ये सकारात्मक सूर अधिक असला तरी काही प्रेक्षकांनी टीकाही केली. एका चाहत्याने लिहिले, सिद्धार्थ आणि जान्हवी यांच्यातील ‘केमिस्ट्री’ या चित्रपटाचा आत्मा आहे.
आणखी एका युझरने म्हटले, व्वा, ‘परम सुंदरी’ म्हणजे निव्वळ जादू आहे. एकाने संगीताचे कौतुक करत लिहिले, हा एक उत्कृष्ट हिंदी रोमँटिक चित्रपट आहे. चित्रपटातील गाणी, विशेषतः सोनू निगमने गायलेले ‘परदेसिया’ मनाला भावते. काहींच्या मते, चित्रपटाची कथा जुनीच असून त्यात काहीही नवीन नाही. एका युझरने लिहिले, अत्यंत वाईट चित्रपट. मी हा चित्रपट पाहण्याचा विचार का केला, हेच कळत नाही. आणखी एकाने म्हटले, तेच तेच... काहीच नवीन नाही.