पुढारी ऑनलाईन : अलीकडेच सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण करणार्या पलक तिवारीने ( Palak Tiwari ) टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. आई श्वेता तिवारींनी टीव्ही मालिकांमध्ये भरपूर काम केले असल्याने तेथे काही करण्याची आवश्यकता नाही, असे पलकचे मत आहे.
वास्तविक, आई ख्यातनाम कलाकार असल्याने पलकला ( Palak Tiwari ) टीव्ही मालिकांची ऑफर येणे साहजिक होते. शिवाय, ती अगदी सहजपणे यात उतरू शकली असती; पण यानंतरही तिने चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
ती याबाबत म्हणाली, माझ्या आईने टीव्हीसाठी बरीच वर्षे काम केले आहे आणि तिने जी भूमिका आली, त्या भूमिकेला न्यायही दिला. त्यामुळे तेथे करण्यासारखे काहीच नाही. शिवाय, टीव्हीसाठी काम केले, तर तुलनादेखील होईल; पण मुळातच मला टीव्हीसाठी काम करायचे नाही.
पलकची आई श्वेता तिवारीने 1999 मध्ये अभिनय क्षेत्रातील पदार्पणानंतर 'कसोटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारली व ती लोकप्रियही ठरली. पलकने मात्र बॉलीवूडकडे मोर्चा वळवला आहे. चित्रपटात सुरुवात करणे कठीण होते; पण प्रारंभीच सलमान खानच्या चित्रपटात संधी मिळाल्याने मी सुदैवी ठरले, असे ती या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली.
'किसी की भाई, किसी की जान' या चित्रपटात पलकसमवेत पूजा हेगडे, शेहनाज गिल, विनाली भटनागर, राघव व भूमिका चावला यांच्याही भूमिका आहेत.