

मुंबई: कोरोना महामारीच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची संजीवनी ठरलेल्या ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवरील थेट चित्रपट प्रदर्शनाचा 'सुवर्णकाळ' आता संपल्यात जमा आहे. एकेकाळी निर्माते आणि स्ट्रीमिंग कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर वाटणारा हा ट्रेंड आता आपली चमक गमावत असून, चित्रपट निर्माते पुन्हा एकदा चित्रपटगृहांच्या मोठ्या पडद्याकडे आकर्षित होत आहेत.
कोरोना काळात OTTची प्रचंड चलती
कोरोना काळात चित्रपटगृहे बंद असताना अनेक मोठ्या आणि लहान चित्रपटांनी थेट ओटीटीचा मार्ग धरला होता. हा एक तात्पुरता पण यशस्वी प्रयोग ठरला. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने आणि प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांकडे वळल्याने थेट ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.
मीडिया कन्सल्टन्सी फर्म 'ऑर्मॅक्स'च्या अहवालानुसार, ओटीटीवर थेट प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा आलेख २०२२ पासून सातत्याने खाली येत आहे. ही घट केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही दिसून येत आहे. जागतिक स्तरावरही, २०२४ पर्यंत प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील ओरिजिनल चित्रपटांमध्ये थेट-ओटीटी चित्रपटांचा वाटा केवळ १८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
२०२१: हे वर्ष ओटीटीसाठी सर्वाधिक यशस्वी ठरले. तब्बल ५३ हिंदी चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले.
२०२३: हा आकडा जवळपास ४० टक्क्यांनी घसरून ३२ चित्रपटांवर आला.
२०२४: या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ १८ हिंदी चित्रपट थेट ओटीटीवर आले आहेत, जे या ट्रेंडची घसरण स्पष्ट करते.
थेट ओटीटी रिलीजचा जोर कमी होण्यामागे केवळ प्रेक्षकांची बदललेली आवडच नाही, तर व्यावसायिक गणितेही तितकीच महत्त्वाची आहेत.
प्लॅटफॉर्म्सची बदललेली व्यावसायिक गणितं: सुरुवातीला सदस्यसंख्या वाढवण्यासाठी ओटीटी कंपन्यांनी चित्रपटांवर मोठी रक्कम गुंतवली. मात्र, आता त्यांचे लक्ष नफा मिळवण्यावर केंद्रित झाले आहे. एका चित्रपटावर मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी, सातत्याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या वेब सिरीज किंवा कमी बजेटच्या कंटेटमध्ये गुंतवणूक करणे त्यांना अधिक फायदेशीर वाटत आहे.
'थिएटरिकल विंडो'चा फायदा: चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाला प्रमोशन, मीडिया कव्हरेज, समीक्षकांचे रिव्ह्यू आणि 'वर्ड ऑफ माउथ' (माउथ पब्लिसिटी) यातून एक मोठी प्रसिद्धी मिळते. या 'हाइप'मुळे जेव्हा तोच चित्रपट काही आठवड्यांनंतर ओटीटीवर येतो, तेव्हा त्याला तिथेही मोठी व्ह्यूअरशिप मिळते. थेट ओटीटी रिलीजमध्ये हा सर्वात मोठा फायदा मिळत नाही.
मोठ्या पडद्याच्या अनुभवाची ओढ: सुरुवातीला घरात बसून चित्रपट पाहण्याची जी उत्सुकता होती, ती आता कमी झाली आहे. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर डॉल्बी साउंड सिस्टीमच्या साथीने चित्रपट पाहण्याचा अनुभव पुन्हा घेऊ इच्छित आहेत.
गुणवत्तेचा वाढता आग्रह: ओटीटी आता कोणताही चित्रपट सहज स्वीकारत नाही. कथेची गुणवत्ता, कलाकारांची निवड आणि निर्मितीमूल्य यावर अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे केवळ चित्रपट बनवला म्हणून तो ओटीटीवर विकला जाईल, ही परिस्थिती आता राहिलेली नाही.
याचा अर्थ ओटीटीचे महत्त्व कमी झाले आहे का? तर नाही. ओटीटी हे माध्यम काही विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांसाठी अजूनही एक उत्तम व्यासपीठ आहे. ज्या चित्रपटांची कथा वेगळी आहे, ज्यात मोठे स्टार्स नाहीत किंवा जे लहान-मध्यम बजेटचे आहेत, त्यांना थेट ओटीटीवर चांगला प्रेक्षकवर्ग मिळू शकतो. मात्र, मोठ्या बजेटच्या आणि बिग-स्टारर चित्रपटांसाठी चित्रपटगृह हाच पहिला आणि सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, चित्रपटगृहे आणि ओटीटी हे एकमेकांना पर्याय नसून, ते मनोरंजनाच्या एका मोठ्या इकोसिस्टमचे दोन महत्त्वाचे भाग आहेत.
चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतरही OTTवर चाहतावर्ग वाढेल
चित्रपट प्रथम चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन आपली व्यावसायिक गणितं जुळवेल आणि त्यानंतर काही आठवड्यांनी ओटीटीवर येऊन आपला चाहतावर्ग वाढवेल, हाच पारंपरिक मार्ग भविष्यात अधिक प्रभावी ठरणार आहे. ओटीटीवरील थेट प्रदर्शनाचा 'पिक्चर' आता बदलला असून, हे क्षेत्र अधिक परिपक्व आणि स्पर्धात्मक बनले आहे, हेच यातून स्पष्ट होते.