

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड आणि पंजाबीमधील प्रसिद्ध गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) गेल्या काही वर्षांपासून दुर्धर आजाराशी लढा देत आहे. तिने स्वतःच इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत तिच्या आजाराबद्दल माहिती दिलेली आहे. नेहाला Premenstrual Dysphoric Disorder (PMDD), Fibromyalgia आणि Obsessive Compulsive Personality Disorder असे आजार निष्पन्न झालेले आहेत. नेहाने अत्यंत धाडसाने सोशल मीडियावर तिच्या आजारांबद्दल लिहिलेले आहे.
गेली काही वर्षं सातत्याने थकवा, वेदना आणि चिंता यामुळे मी त्रस्त आहे, असे तिने म्हटले आहे. शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतानाही सातत्याने तिने तिची कला सादर केली आहे. या आजारांबद्दल जागृती व्हावी, यासाठी तिने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच चाहत्यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे ही म्हणते.
Premenstrual Dysphoric Disorder (PMDD) हा PMSचा तीव्र प्रकार मानला जातो, यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. तर Fibromyalgia या आजारात रुग्णाला संपूर्ण शरीरात वेदना होतात, झोप येत नाही आणि सतत थकवा जाणवतो. Obsessive Complusive Personality Disorder हा मानसिक आजार आहे, यामध्ये रुग्ण सतत अतिशिस्तबद्ध राहणे, एखादी गोष्ट चोख झाली पाहिजे याचा अतिरेक असे प्रकार दिसून येतात.
मी याबद्दल लिहीत आहे, याचे कारण मी स्वतःला पीडित मानत नाही, तसेच मी स्वतःला विजेताही समजत नाही. मला लिहिणे जास्त समाधानकारक वाटते. मी सर्वांना यासोबत भरपूर प्रेमही देत आहे, असे तिने म्हटले आहे.