अभिनेता चंकी पांडे आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांची जोडी चांगलीच गाजली होती. दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र अभिनय केला होता. आता नीलमने 'आग ही आग' या सिनेमादरम्यानच्या एका किस्स्यावर भाष्य केले आहे. हा सिनेमा १९८७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चंकी पांडे, धर्मेंद्र, गुलशन ग्रोवर आणि नीलम कोठारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यावेळी चंकीच्या एका कृतीमुळे नीलम प्रचंड संतापली होती आणि त्याचा जीव घ्यावासा वाटत होते, असे तिने सांगितले आहे. नीलम ही 'नेटफ्लिक्स'वरील सीरिज 'फॅब्युलस लाईव्हज व्हर्सेस बॉलीवूड वाईव्हज' या शोमध्ये पोहोचली होती. नीलम म्हणाली की, चंकी माझा खूप चांगला मित्र आहे.
मात्र, एक काळ असा होता त्यावेळी मला त्याचा जीव घ्यावासा वाटत होता. तो मला सेटवर त्रास द्यायचा; कारण तो नवीन होता आणि खूप वेळ घ्यायचा. शॉट तयार आहे, कॅमेरे सेट आहेत; पण चंकी कुठे आहे, तर चंकी बाथरूममध्ये असायचा. हे अनेकवेळा व्हायचे. त्यामुळे मला त्याचा जीव घ्यावा वाटत होता. 'आग ही आग' या सिनेमातील एका सीनमध्ये माझे लग्न दुसऱ्याशी होत होते आणि त्यावेळी चंकीला बाईकवर यायचे होते. मला तो मंडपातून उचलून बाईकवरून निघून जाणार होता. मी त्याला विचारले की, तुला बाईक चालवता येते काय? तो हो म्हणाला. त्याने मला बाईकवर बसवले आणि इतक्या जोराने एक्सिलेटर दाबला की, गाडीचे संतुलन बिघडले आणि मी वधूच्याच वेशात खाली पडले. त्यानंतर माझ्यावर बाईक पडली. माझा पाय भाजला. त्यावेळी मला त्याचा जीव घ्यावा वाटत होता. त्यावेळी झालेल्या जखमेची खूण अजूनही माझ्या पायावर आहे.