

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय हिच्यासोबत अलीकडेच एक मोठा अनर्थ घडता-घडता टळला. जंगलात ट्रेकिंगसाठी गेलेल्या मौनीला अचानक जंगली प्राण्याची गर्जना ऐकू आली आणि चित्ता किंवा बिबट्याचा हा आवाज ऐकून मौनी आणि तिच्या सहकार्यांना जीव वाचवण्यासाठी तत्काळ तिथून पळ काढावा लागला.
हा संपूर्ण अनुभव मौनीने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, ट्रेकदरम्यानचे काही फोटोही तिने पोस्ट केले आहेत. मौनीने लिहिले आहे की, “आज जंगलात ट्रेकिंगला गेलो होतो. चढ-उतार केले, धबधब्यांमधून चाललो आणि अचानक बिबट्या/चित्त्याची दहाड ऐकू आली. मग काय जीव वाचवून पळावं लागलं. सगळ्यांना सुट्ट्यांच्या शुभेच्छा!”
मौनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती चित्ता प्रिंट पँट आणि स्वेटर घालून कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती जंगलाच्या मध्यभागी बसून निसर्गाचा आनंद घेताना दिसते. कामाबाबतीत बोलायचं झालं, तर मौनी लवकरच एका ओटीटी थ्रिलर सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यात तिच्यासोबत निमृत कौर अहलूवालिया आणि शाहीर शेख दिसणार आहेत. याशिवाय ती ‘है जवानी तो इश्क होना है’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. मधुर भंडारकर यांच्या ‘द वाइव्हस’ मध्येही ती आहे.