मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये अनेक लैंगिक शोषणाची प्रकरणे गाजली आहेत. मीटू या मोहिमेमुळ तर अनेक प्रसिध्द व्यक्तींची नावे समोर आली होती. आता एका मॉडेल, अभिनेत्रीने बॉलिवूडमधील तब्बल ९ दिग्गज व्यक्तींवर शोषणाचे आरोप केले आहेत. तिने त्यांच्यावर मारहाणीचादेखील आरोप केला आहे.
२८ वर्षीय मॉडेल, अभिनेत्रीनं बॉलिवूडमधील नऊ प्रसिद्ध व्यक्तींविरोधात लैंगिक शोषण आणि मारहाणीचा आरोप केला आहे. तिने याबाबत पोलिसात तक्रार केली आहे, या तक्रारीनुसार, मागील काही वर्षांमध्ये या व्यक्तींनी तिचं लैंगिक शोषण केलं आहे. हा सर्व प्रकार २०१३ ते २०१९ दरम्यान घडल्याचं तिनं सांगितलं आहे.
या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध फोटोग्राफार कोल्टन जूलियन, क्वॉन एंटरटेनमेंटचे माजी को-फाउंडर अनिर्बान ब्लाह, निर्माता-अभिनेता जॅकी भगनानी, टी-सीरिजचे कृष्ण कुमार, जीरोधाचे को-फाउंडर निखिल कामत, एएचएचे सीईओ अजित ठाकुर, शील गुप्ता, निर्माता विष्णु इंदुरी आणि गुरजोत सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
तिने १२ एप्रिलला सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं होतं. याविषयी ती म्हणाली की, 'या सर्व घटना माझ्यासोबत २०१३ ते २०१९ या काळात घडल्या आहेत. मी ११ लोकांवर आरोप केले आहेत. मात्र पोलिसांनी केवळ नऊ लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. कारण, मुंबईच्या बाहेर घडलेल्या घटनांच्या तक्रारी ते दाखल करून घेऊ शकत नाहीत. मी डीसीपी महेश्वर रेड्डी यांना १ एप्रिलला भेटले होते. मात्र तक्रार २६ मे रोजी दाखल करण्यात आली आहे.'
सदर अभिनेत्री चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईमध्ये आली होती. चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली तिची फसवणूक झाली. याबाबत अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. फोटोग्राफर कोल्सटन जूलियनने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला तसेच मारहाणही केली असे तिने म्हटलं आहे.