

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार चिरंजीवी ब्रिटिश सरकारकडून ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ मिळवणारे पहिले भारतीय सेलिब्रिटी ठरले आहेत. १९ मार्च २०२५ रोजी लंडनच्या यूके संसदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिनेमा आणि समाजातील त्यांच्या भरीव योगदानासाठी हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठी हा एक अभिमानास्पद क्षण मानला जात आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी गौरवाचा क्षण आहे.
ब्रिटनमधील प्रसिद्ध ब्राइट इंडिया या संस्थेने प्रथमच चिरंजीवी यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान केला आहे. सिनेमा, समाजसेवा आणि परोपकार या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला. यू.के. लेबर पार्टीचे खासदार नवेंदु मिश्रा, खासदार सोजन जोसेफ आणि बॉब ब्लॅकमॅन यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. चिरंजीवी यांचा हा गौरव त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे.
२०२४ मध्ये चिरंजीवी यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभूषण’ प्रदान करण्यात आला. त्याच वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले. त्यांनी १५६ चित्रपटांमध्ये ५३७ गाण्यांसह २४,००० डान्स स्टेप्स पूर्ण केल्या आहेत. तसेच, अक्किनेनी इंटरनॅशनल फाउंडेशनकडून एएनआर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चिरंजीवी सध्या आपल्या 'विश्वंभरा' या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. तसेच, ‘दशहरा’ आणि ‘द पैराडाइज’चे दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांच्यासोबत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिंसक भुमिका असलेल्या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता नानी करणार आहेत.