मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं करोनामुळं निधन झालं आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ३९ वर्षांच्या होत्या.
कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कादंबरी कडू यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडपासून मराठी सिनेसृष्टी आणि कलाक्षेत्रात अनेकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे. त्यातच कादंबरी यांच्या जाण्याने कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भूषण यांना प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. कांदबरी या भूषण यांच्या दुस-या पत्नी होत्या. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेता भूषण कडू सहभागी झाला होता. यावेळी त्या मुलगा प्रकीर्त सोबत भूषणच्या भेटीला आले होते. यावेळी बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला पाहून भुषण ढसाढसा रडला होता. त्यावेळी हा एपिसोड पाहून चाहते देखील भावूक झाले होते.
छोट्या पडद्यावर प्रसारीत होणारी 'कॉमेडी एक्प्रेस' या विनोदी शो मधून भूषण घराघरात पोहचले. विनोदाच्या त्यांच्या अफलातून टायमिंगसाठी ते ओळखले जातात. अनेक चित्रपट, मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. यासोबतच 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' अशा शो मधुनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
मस्त चाललंय आमचं, श्यामची मम्मी, भुताची शाळा, टारगेट अशा विविध कालकृतींमधून भूषणने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मात्र आज भूषणच्या संपूर्ण कुटुंबावर त्याच्या पत्नीच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. कादंबरी यांच्या निधनाबद्दल मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.