
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या मुलाने आत्महत्या केल्याच्या बातमीने गुरुवारी सकाळी मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. पण या धक्कादायक बातमीमागे नेमकं सत्य काय आहे? खरंच रेशम यांच्या मुलाने इतके टोकाचे पाऊल उचलले आहे का? चला, या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेऊया.
सुरुवात झाली एका सोशल पोस्टमुळे. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील कांदिवली परिसरात एका गुजराती अभिनेत्रीच्या ८ वर्षीय मुलाने ५६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची एक अत्यंत दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कांदिवलीतील ब्रूक बिल्डिंगमध्ये घडली आहे. मृत मुलाचे नाव पंत आरती मकवाना असून, त्याने इमारतीच्या ५६ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
"आईने शिकवणीला जाण्यास सांगितल्याच्या रागातून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना, एका एका सोशल पोस्टमध्ये अभिनेत्री रेशम टिपणीस आणि तिचा मुलगा मानव यांचा फोटो वापरला.
रेशम आणि तिच्या मुलाचा फोटो या दुःखद बातमीसोबत पाहिल्यानंतर, ही घटना त्यांच्याच बाबतीत घडल्याचा मोठा गैरसमज निर्माण झाला आणि ही अफवा वेगाने पसरली.
आपल्या मुलाविषयीची ही खोटी बातमी पसरत असल्याचे लक्षात येताच, अभिनेत्री रेशम टिपणीस यांनी तातडीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आणि सत्य परिस्थिती समोर आणली.
आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, "माझ्या लेकाबद्दल खोटी बातमी पसरवली जात आहे. कृपया याकडे दुर्लक्ष करा. बाप्पाच्या आशीर्वादाने माझा मुलगा मानव ठणठणीत आहे. पण ज्याने कोणी हे केलंय, त्याच्यावर कडक कारवाई होणार हे नक्की."
रेशम यांच्या या स्पष्टीकरणानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, अशाप्रकारे कोणतीही खातरजमा न करता संवेदनशील घटनेसाठी दुसऱ्यांचे फोटो वापरण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील 'सिद्धा सीब्रुक' नावाच्या उच्चभ्रू इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. एका गुजराती टीव्ही अभिनेत्रीचा ८ वर्षांचा मुलगा तिथे राहत होता. आईने क्लासला जाण्यास सांगितल्यावर रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
थोडक्यात, अभिनेत्री रेशम टिपणीस यांचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आणि ठणठणीत आहे. एका चुकीच्या बातमीमुळे पसरलेल्या या अफवेने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.