

Marathi actor Sagar Talashikar slams social media fake death rumors : मागील काही दिवसांमध्ये केवळ काही पैशांसाठी आणि क्षणिक प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा पाऊस पाडणाऱ्यांचे पेव फुटले आहे. 'लाईक्स' आणि 'व्ह्यूज'च्या आहारी गेलेले काही जण वास्तवाचा विपर्यास करत अतिशय बेजबाबदारपणे अफवा पसरवत आहेत. पूर्णपणे निराधार असणाऱ्या अशा वृत्तांमुळे निष्पाप लोकांना होणारा मानसिक त्रास शब्दात व्यक्तही करता येत नाही इतका भयंकर असतो. अशाच निराधार बातम्यांमध्ये नुकतीच मराठी अभिनेते सागर तलाशीकर यांच्याबाबतची फेक न्यूज व्हायरल झाली. यावर स्वतः सागर तळाशीकर यांनी फेसबुक पोस्ट लिहीत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
सागर तळाशीकर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, काल माझ्या कोल्हापुरातील, विद्यापीठ हायस्कूलचे आदरणीय गुरुजी श्री. प्रदीप गबाले (वय साधारण ८०/८२) यांचा मेसेज आला होता. “महत्वाचे काम आहे, ताबडतोब फोन करा”. मी उशिरा बघितला;पण लगेच फोन केला.. आवाज ऐकल्यावर म्हणाले, तुमचा आवाज ऐकला आणि हायसं वाटलं, मला माझ्या अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांचा फोन आला होता, आणि तो म्हणाला सागर तळाशीकरांची दुःखद बातमी खरी आहे का ? म्हणून मेसेज केला.
सकाळपासून अस्वस्थ होतो, बाकी काही नाही.”….परवाच माझा एक पॉडकास्ट एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित झाला. बऱ्याच लोकांनी तो पाहिला, आवडल्याचे फोनही आले. व्यवस्थित घेतला होता, मलाही आवडला. यात त्यांचा बिलकुल दोष नाही. परंतु हा पॉडकास्ट प्रसारित झाल्यानंतर इतर ज्या सिरियलच्या बातम्या आणि इतर पॉडकास्ट पाहून त्यावर आपल्या बातम्या वैयक्तिक युट्यूब चॅनेलवर प्रसारित करतात त्यांचे मथळे इतके भयंकर असतात, की एखाद्याच्या परिवारात, मित्रमंडळीत, हितचिंतकात भयंकर अफवा पसरवू शकतात.. मानसिक त्रास तर ते देतातच पण शारीरिक त्रास सुद्धा होऊ शकतो.. पण त्यांना फक्त व्ह्यूज, लाइक आणि सबस्क्राइबर हवे असतात, मग त्यामुळे मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही उलथापालथ झाली तरी बेहत्तर! त्या मथळ्यांचे स्क्रीन शॉट टाकतो आहे.. तेच जास्त बोलतील आणि अर्थ पोहोचवतील.. मागे अशीच एक बातमी माझ्या आणि आसावरी जोशी यांच्या न झालेल्या अपघाताबद्दल होती, असेही सागर तळाशीकर यांनी नमूद केले आहे.
असो, मला या लोकांना उत्तर देणे त्यांच्यावर लिहीत बसणे वगैरे निरर्थक वाटत आलेले आहे, पण यावेळी माझ्या वयस्कर शिक्षकांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल, फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेल्या काही टोळ्यांवद्दल लिहिणं भाग पडलं.. बरोबर काही स्क्रीनशॉट टाकत आहे, ज्यात इतर कलाकारांच्या बाबतीतही असेच मथळे आले आहेत. माझ्या सर्व हितचिंतकांचे आभार, निंदकांना खूप प्रेम, अशा शब्दांमध्ये सागर तळाशीकर यांनी निराधार माहिती पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.