

मुंबई : मालाड पूर्वेतील बाणडोंगरी, पुष्पापार्क परिसरात पुनर्विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची घरे बेकायदेशीररीत्या पाडली जात असल्याचा गंभीर आरोप प्रसिद्ध मराठी अभिनेते अभिजीत केळकर यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक भावूक आणि तितकीच आक्रमक पोस्ट लिहीत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली असून, या प्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. या भागात बिल्डर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या संगनमताने गरिबांचे हक्क हिरावून घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अभिजीत केळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुष्पापार्क आणि बाणडोंगरी भागातील घरे ही केवळ इमारती नसून त्यांच्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून, काडी काडी जमवून उभे केलेले संसार आहेत. ते स्वतः याच चाळीत आणि झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले आहेत. मात्र सध्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बिल्डर यांच्याकडून गोरगरिबांच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. बिल्डरने पैशाच्या बळावर संपूर्ण यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना आपल्या हातातील बाहुले बनवले असून, स्थानिक गुंडांमार्फत नागरिकांना धमक्या दिल्या जात आहेत. रहिवाशांना कुठलीही कागदपत्रे न दाखवता आणि अधिकृत करार न करताच घरे जमीनदोस्त केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून आपण या अन्यायाविरोधात लढा देत असल्याचे स्पष्ट करताना केळकर यांनी आपल्याला जीवे मारण्याची भीती असल्याचेही नमूद केले. कोणाची विनाकारण बदनामी करायची नसल्याने सध्यातरी नावे जाहीर करत नाही, परंतु गरज पडल्यास ती उघड करावी लागतील असा इशारा त्यांनी दिला. आपण कोणालाही घाबरत नसून घरात आई, पत्नी आणि मुलांना परिस्थितीची पूर्वकल्पना देऊनच या लढ्यात उतरलो असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आपण रिडेव्हलपमेंटच्या विरोधात नसून ज्या विकासाचा पायाच बनावट कागदपत्रांवर रचला जात आहे, त्याला आपला विरोध असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. शासन आणि वरिष्ठ नेतृत्वावर आपला अद्याप पूर्ण विश्वास असूनही स्थानिक पातळीवर 'दिव्याखाली अंधार' अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गरिबांना त्यांची हक्काची घरे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एका लोकप्रिय अभिनेत्याने थेट मैदानात उतरून हा प्रश्न चव्हाट्यावर आणल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाल्याची चर्चा रंगली आहे.