

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलिया दौर्यावर एक अनपेक्षित आणि मोठा आर्थिक फटका बसला. मेलबर्न विमानतळावर तिने केसात माळलेला जाईच्या फुलांचा गजरा कस्टम अधिकार्यांकडे घोषित न केल्यामुळे तिला सुमारे 1,980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.14 लाख रुपये) इतका मोठा दंड ठोठावला. ही चूक अनवधानाने झाल्याचे सांगत नव्याने आता दंड माफ करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कृषी विभागाकडे विनंती अर्ज केला.
सिंगापूरमधून एका विशेष मुलाखतीत बोलताना नव्या म्हणाली, मला धक्काच बसला. ही दंडाची रक्कम खूप मोठी आहे. गोष्ट अशी आहे की, मी बॅगेत फुले लपवून नेत नव्हते. गजरा माझ्या केसांमध्ये होता, त्यामुळे लपवण्याचा प्रश्नच नव्हता. पण, डिक्लरेशन फॉर्ममध्ये त्याची नोंद करायची माझ्याकडून राहून गेली. प्रवासाच्या सुरुवातीला मी तो बॅगेत ठेवला होता, त्यामुळे स्निफर डॉग्सनी तो ओळखला.
आता नव्याने या दंडाच्या रकमेतून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिने ऑस्ट्रेलियन कृषी विभागाला ई-मेलद्वारे संपर्क साधला आहे. मी त्यांना दंड माफ करण्याची विनंती केली आहे, जर दंड माफ झाला नाही, तर तो इतका जास्त का आहे, हे मला कळत नाहीये. मी अनेक लेखांमध्ये वाचले होते की, साधारणपणे 300 डॉलर्स दंड आकारला जातो. माझ्या पावतीवर 66 युनिटस् असे लिहिले आहे, ज्याचा अर्थ मला समजला नाही.