

महिमा चौधरी हिने १९९७ मध्ये आलेल्या 'परदेस' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटातून महिमाने अभिनयाची झलक दाखवली; पण दुर्दैवाने १९९९ मध्ये 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी तिचा भीषण अपघात झाला. एका मुलाखतीत महिमाने यावर भाष्य केले आहे. महिमा म्हणाली की, या अपघातानंतर ती पुन्हा बॉलीवूडमध्ये काम करू शकणार नसल्याचे मला वाटले. कारण, माझ्या चेहऱ्यावरून डॉक्टरांनी सुमारे ६७ काचेचे तुकडे काढले होते.
माझा अपघात झाला होता, त्यावेळी मला जाणवले नाही की, माझ्या चेहऱ्यावर एवढ्या जखमा असतील. मी बाथरुममध्ये गेले आणि आरशात चेहरा पाहिला, त्यावेळी मला समजले. त्यापूर्वी मी दिग्दर्शक प्रकाश झा याना सांगत होते की, गंभीर काही नसेल, तर आपण चित्रीकरण पूर्ववत करू शकतो. कारण, डॉक्टरांनी स्कॅन बगैरे केले होते. त्यावेळी ते म्हणाले, नाही नाही. आपण थांबूया. आपण सर्वजण बाहेर जाऊ आणि तारखांबावत बोलू. अजय देवगण आणि प्रकाश झा परतले, त्यावेळी सर्वात अगोदर मी त्यांना विनंती केली की, कृपाकरून कोणालाच याबाबत काहीच सांगू नका. अपघातामुळे माझा चेहरा इतका खराब झाला आहे, हे कोणाला कळ देऊ नका. मला माझे करिअर वाचवण्यासाठी प्रयत्न करू या. तो काळ खूप कठीण होता. कारण, कमी वयात मी ते सर्व सहन केले होते.