

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या स्टँड-अप शोदरम्यान '३७० रुपयांची बिर्याणी' या विधानावरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. या संपूर्ण वादावर आता कॉमेडियन कुणाल कामराने प्रणीत मोरेचा खरपूस समाचार घेतला असून त्याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रणीत मोरेच्या एका शोमधील प्रेक्षक हिमांशु जांगडा याच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.
या वादग्रस्त क्लिपमध्ये २३ वर्षीय प्रेक्षक हिमांशु जांगडा याने असा दावा केला होता की, त्याने एका डेटदरम्यान चिकन बिर्याणीच्या प्लेटवर ३७० रुपये खर्च केले होते, त्यामुळे त्याला त्याच्या या गुंतवणुकीवर 'परतावा' मिळायला हवा होता. या विधानावर प्रणीत मोरे स्वतः हसला आणि त्याने जांगडाला पुढे बोलण्यास प्रोत्साहन दिले. कथित स्त्रीद्वेषी आणि वादग्रस्त विधानांना आपल्या शोमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रणीत मोरेवर इंटरनेटवर सर्व स्तरातून तीव्र टीका झाली होती. चौफेर टीका झाल्यानंतर प्रणीत मोरेने एक माफीनामा व्हिडिओ जारी केला. त्यात त्याने प्रेक्षक हिमांशुला रोखण्याऐवजी प्रोत्साहन देणे चुकीचे होते, अशी कबुली दिली आहे.
आपल्या माफीनाम्यात प्रणीत मोरे म्हणाला की, त्याला सध्या ज्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, तो योग्यच आहे. जेव्हा हिमांशु आक्षेपार्ह टिप्पणी करत होता, तेव्हा आपण हस्तक्षेप करून त्याला थांबवू शकलो असतो; मात्र तसे न करता आपण त्याला व्यासपीठ दिले आणि त्यामुळेच ही परिस्थिती बिघडली. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची प्रणीतने माफी मागितली आहे. तसेच, आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांमध्ये आपण प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी त्याने जनतेकडे आणखी एक संधी मागितली आहे.
प्रणीतच्या या माफीनाम्यावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामराने 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. कामराने म्हटलंय की, ‘विनोदवीरांनी ज्या गोष्टींच्या मागे लपणे बंद केले पाहिजे, त्या अशा: १. स्टोरीटेलिंग (कथाकथन), २. क्राउड वर्क (प्रेक्षकांशी संवाद), ३. कठोर परिश्रम, ४. बँक बॅलन्स आणि ५. आई-वडील.’ यासोबतच गुरुवारी केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये कामराने उपरोधिक टोला लगावत म्हटले की, ‘प्रणीत मोरेचा खेळ पाहिला की हर्ष गुजराल सुद्धा बराक ओबामासारखा वाटू लागतो.’
या वादाचे गंभीर परिणाम वादग्रस्त विधान करणाऱ्या हिमांशु जांगडालाही भोगावे लागले आहेत. जांगडा हा 'स्टारविक डिझाईन' या कंपनीत कार्यरत होता. कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एक अधिकृत घोषणा करत, या व्हायरल वादानंतर जांगडाला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, याच शोमधील आणखी एक व्हिडिओ क्लिप समोर आली असून, त्यात 'एमबीबीएस' (MBBS) पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पुरुषांच्या मृतदेहांबाबत अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह विनोद केल्याचे उघड झाले. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सायबर सेलने प्रणीत मोरे, हिमांशु जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरुद्ध इंटरनेटवर अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या व्हिडिओची स्वेच्छेने (सुओ मोटो) दखल घेतली असून सुनावणीची नोटीस बजावली आहे. या नोटीसअन्वये प्रणीत मोरे आणि हिमांशु जांगडा या दोघांनाही येत्या २२ जून रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.