रणवीर सिंगच्या बहुचर्चित स्पाय-अॅक्शन चित्रपट ‘धुरंधर’च्या दुसर्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चर्चेत आता अभिनेत्री क्रिस्टल डीसूझा हिचे नावही जोडले गेले असून, ‘धुरंधर 2’मध्ये तिची महत्त्वाची भूमिका असणार का, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ या गाजलेल्या गाण्यातील तिच्या सादरीकरणानंतर ही चर्चा अधिकच रंगली आहे.
‘शरारत’ या गाण्यात क्रिस्टल डीसूझाने आयेशा खानसोबत दमदार परफॉर्मन्स केला होता. हे गाणे प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि सोशल मीडियावर कोट्यवधी व्ह्यूज मिळवत चर्चेचा विषय ठरले. या संदर्भात क्रिस्टलने, ‘लवकरच लांगू..’ असे म्हणत तिने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली. ‘स्पायचं कामच असतं गोष्टी लपवून ठेवणं.’ असेही ती म्हणाली. या विधानामुळे ‘धुरंधर 2’ मधील तिच्या सहभागाबाबत चर्चा आणखी वेगाने पसरली. तथापि, या सर्व चर्चांनंतरही चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘धुरंधर 2’च्या कलाकारांची अंतिम यादी किंवा प्रमोशनल साहित्यही सध्या समोर आलेले नाही. ‘शरारत’ या गाण्यात तमन्ना भाटियाच्या जागी स्वतःची निवड कशी झाली, याबाबत क्रिस्टलने सांगितले होते की, ‘जे नियतीत असतं, तेच घडतं. मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तमन्ना अप्रतिम आहे, सुंदर आहे आणि ती तिच्या कामात खूप चांगली आहे. प्रत्येकाच्या नशिबात जे लिहिलेले असते, ते त्यांना मिळते. मला वाटते की हे गाणे माझ्यासाठी आणि आयेशासाठीच लिहिलेले होते. पण याचा अर्थ असा नाही की तमन्ना कमी सुंदर किंवा कमी प्रतिभावान आहे.’ ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 2026 ईद दरम्यान प्रदर्शित होणार असून, यावेळी अधिक व्यापक जागतिक प्रदर्शनाची आशा व्यक्त केली जात आहे.